। पनवेल । प्रतिनिधी ।
श्रीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खारघर पोलिसांकडून सेक्टर-11 येथील केंद्रीय विहार मेट्रो स्थानकासमोर दंगा नियंत्रण पथकाची रंगीत तालीम घेण्यात आली.
खारघर शहराचा वाढता विस्तार, लोकसंख्येत होणारी वाढ तसेच घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवात वाढ झाल्याने उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर येतात. गणेश विसर्जन मिरवणुका, गर्दीची ठिकाणे आणि संवेदनशील परिस्थितीत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दंगा नियंत्रण पथकातील अधिकारी व अंमलदारांना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले.
या रंगीत तालीममध्ये खारघर पोलीस ठाण्यातील एक पोलीस निरीक्षक, चार सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि 32 पोलीस अंमलदार, असे एकूण 37 अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी दंगा नियंत्रण योजनेनुसार करण्यात येणाऱ्या विविध कवायतींचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
पोलीस कर्मचारी महारुद्र देठे यांनी प्रशिक्षक म्हणून सहभागी अधिकारी व अंमलदारांना विविध कवायतींचे प्रशिक्षण दिले. गर्दीवर नियंत्रण मिळविणे, प्रतिकूल परिस्थिती हाताळणे तसेच संभाव्य अनुचित प्रकारांना सामोरे जाताना घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
श्रीगणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, तसेच आपत्कालीन परिस्थितीत पोलीस यंत्रणेने प्रभावीपणे प्रतिसाद द्यावा, यासाठी या सरावाचे आयोजन करण्यात आल्याचे खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी यांनी सांगितले. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत संभाव्य परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस दलाची तयारी, समन्वय आणि प्रतिसादक्षमता तपासण्याच्या दृष्टीने ही रंगीत तालीम महत्त्वाची ठरली.
खारघरमध्ये ‘दंगा नियंत्रण पथका’ची रंगीत तालीम
