। उरण । वार्ताहर ।
उरण शहरात पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी काही ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, 16-20 दिवसांपासून हे खड्डे उघडे पडून आहेत. बाजारपेठेसारख्या गर्दीच्या भागात मोठ्या खड्ड्यांभोवती कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. या खड्ड्यांमध्ये पडून एखादी दुर्घटना घडल्यास, जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे प्रशासनावरच गुन्हा दाखल करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. तसेच, रहिवाशांच्या जीवाशी खेळणार्या प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यावर नगरपालिकेने त्वरित ठोस उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा द्यावा लागेल, अशी भावना नागरीकांमधून व्यक्त होत आहे.