। उरण । वार्ताहर ।
उरण शहरात उन्हाळा सुरू होण्याआधीच भीषण पाणी टंचाईचा सामना रहिवाशांना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक सोसायट्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. पाण्याची मागणी वाढल्याने आणि उपलब्धतेत घट झाल्याने ही समस्या उद्भवली आहे.
शहरात पुनर्विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर नवीन इमारतींचे बांधकाम सुरू आहे. त्यानंतरच पाणीपुरवठा अनियमित झाल्याचे येथील रहिवाशांकडून सांगण्यात येत आहे. सोसायटीच्या कमिटीने वारंवार नगरपालिका मुख्याधिकारी आणि पाणी पुरवठा अधिकार्यांकडे तक्रार केली आहे. परंतु, 15-20 दिवस उलटूनही समस्येवर उपाय न केल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप आहे. दरम्यान, उरण नगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कर न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, कर वेळेवर भरूनही जर नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असेल, तर त्याची भरपाई नगरपालिका कशी करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.