। पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील ग.बा. वडेर हायस्कूल मधील 1975च्या दहावीच्या बॅचचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम 14 व 15 फेब्रुवारी रोजी पाली जवळील उन्हेरे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तब्बल पन्नास वर्षानंतर जुने मित्र-मैत्रिणी एकत्र आल्याने वातावरण आनंददायी झाले होते. या सोहळ्यासाठी त्या काळातील गुरुजनांनाही आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी संजू लिमये यांनी लिहिलेले ईशस्तवन व स्वागतगीत अंजू आणि संजू लिमये यांनी सादर केले. उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला, तर शिक्षकांनी त्यांच्या काळातील काही आठवणी सांगितल्या.या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आपल्या यशस्वी कारकिर्दीविषयी माहिती दिली. तसेच, त्यांनी समाजासाठी केलेल्या योगदानाची जाणीव उपस्थितांना करून दिली. काही विद्यार्थ्यांनी सामाजिक उपक्रमांसाठी मदतीचा हात पुढे करण्याची घोषणाही केली. कार्यक्रमाचे संयोजन संतोष देशमुख यांनी केले होते. त्यांच्यासोबत रोहिणी गोखले, राजेंद्र मेहता, शेखर पट्टेकर आणि नीता कानसुपाडा यांनी उत्कृष्ट सहकार्य केले.