। दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन-श्रीवर्धन या सरळ मार्गावरील असुप ते बोर्ली शहरापर्यंत रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. मात्र, यातील कार्ले हद्दीतील अपघाती रस्त्याच्या दुरुस्तीला दिरंगाई होत असल्याने प्रवासाकरीता धोकादायक ठरत आहे.
श्रीवर्धन-बोर्ली मार्ग हा 17 किमी अंतराचा घाट आणि वळणावळणाचा मार्ग आहे. यामधील बोर्ली ते दांडगुरी दरम्यानचा अंदाजे चार किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण होत आहे. मात्र, कार्ले गावाजवळील धोकादायक वळणावरील रस्ता आद्याप रखडला आहे. हा रस्ता अरुंद असून, याची रुंदी आठ ते दहा फुट एवढीच आहे. दुचाकी, व रिक्षा चालकांंना समोरून येणार्या अवजड वाहनांना साईड देतेवेळी रस्त्याच्या खाली उतरावे लागते. त्यामुळे दोन्ही वाहन चालकांमध्ये पदोपदि वाद होण्याच्या घटना घडतच असतात. दरम्यान, चार दिवसांपूर्वी याच वळणावर मोटारससायकल व मिनिडोर यांच्यात अपघाताची घटना घडली होती. त्यामुळे हा धोका पाहता वाहनांचा प्रवास मोठा जिकरीचा ठरत आहे.
तसेच, या मार्गावर तीर्व उतार असल्यामुळे वाहने भरधाव वेगाने येत असतात. आणि अचानक अरुंद रस्ता असल्यामुळे वेगावर नियंत्रण मिळविणे कठीन होते. अशावेळी अपघातालाहि सामोरे जावे लागते. तसेच, साईड पट्टी खचल्याने व खड्यांमुळे दुचाकी वाहनचालकांचे वारंवार अपघात घडत आहेत. यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून या ठिकाणाहून वाहने चालवावी लागत आहे. त्यामुळे प्रवासात आणखी कोणता अनर्थ घडू नये म्हणून रस्त्याची डागडुजी व रुंदीकरण करणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवासी व वाहन चालकांकडून होत आहे.
या मार्गाच्या कामासाठी टेंडर निघून काम सुरू झाले आहे. उर्वरित रस्त्याचे काम दुसर्या ठेकेदाराकडे असून, तेथील रुंदीकरण लवकरच होईल.
तुषार लुंगे,
उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीवर्धन