| कोलाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्ग 66 वरील आंबेवाडी बाजारपेठेत उड्डाण पुलाचे काम सुरु असून, ते अपूर्ण स्थितीत आहे. तसेच पुलाच्या संरक्षण कठड्याचे काम ही अपूर्ण स्थितीत आहेत. अशा परिस्थितीत या उड्डाण पुलावरून वाहतूक सुरु करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत वाहतूक सुरु करण्याची घाई का? का वाहतूक सुरु करून उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले हे भासवून खांब येथील टोल नाका सुरु करण्याचा तर शासनाचा बेत नाही ना! असा संतप्त सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गांवरील आंबेवाडी बाजारपेठेतील उड्डाण पुलाचे काम अर्धवट स्थितीत असतांना महाडकडून मुंबई बाजूकडे जाणाऱ्या एक मार्ग वाहतुकीसाठी खुळा करण्यात आला आहे. परंतु, पुलाच्या काही बाजूचे संरक्षण कठडे अजून ही अपूर्ण स्थितीत फक्त स्टील उभे करण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, यामुळे कोणाचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण? अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
विशेषतः या पुलावर कोणतेही लाईटची सोय नाही. यामुळे रात्रीच्या वेळी अंधारातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. संरक्षण कठडा नसल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे संबंधित विभाग व प्रशासन यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली आहे.
आंबेवाडी पुलावर अपघाताचा धोका
