मोदींच्या स्वागतासाठी रस्त्यांची डागडूजी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात शेतकऱ्यांचा विरोध डावलून टोरंट कंपनीकडून हायड्रॉलिक प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. या प्रस्तावित प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान कर्जत येथे येणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, प्रशासनाने देशाच्या पंतप्रधान यांच्या मार्गावरील रस्ते नव्याने केले जाऊ लागले आहेत, तसेच हेलिपॅडची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतली आहेत. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारकडे पैसे नसताना मोदींच्या स्वागतासाठी पैशांची उधळपट्टी कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायतमधील सायडोंगर येथे टोरंट कंपनीकडून हायड्रॉलिक प्रकल्प उभारला जात आहे. या प्रस्तावित प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या स्वागतासाठी कर्जत तालुक्यात रस्त्यांच्या कामांना वेग आल्याचे चित्र आहे. दि.3 नोव्हेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे जिल्ह्यातील बारामती येथे कार्यक्रमासाठी येत आहेत. त्यानंतर दुसऱ्या सत्रात नरेंद्र मोदी हे कर्जत तालुक्यात येणार असल्याची चर्चा आहे. या अनुषंगाने भालिवडी ग्रामपंचायतमधील पुलाची वाडी लाखाची वाडी येथे बनवण्यात आलेल्या हेलिपॅडपासून कार्यक्रमास्थळी जाणारा रस्ता नव्याने बनविला जात आहे. आंबिवली फाटा ते भीमाशंकर घाट रोड या रस्त्यालगत नागेरे फाट्यावरून जाणारा हा रस्ता बीएसआय ट्रेनिंग सेंटरच्या जवळून सावळे गावाकडे जाणारा पायी रस्ता होता. हा रस्ता अद्याप कोणत्याच निधीतून करण्यात आला नव्हता. परंतु, फक्त मोदी यांच्या आगमनाच्या निमित्ताने येथील अस्तित्वात नसलेल्या आणि केवळ बैलगाडी वाट असलेल्या रस्त्याचे कामाला वेग मिळाला असून, नव्याने रस्ता बनवला जात आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारकडे पैसे नसताना मोदींच्या स्वागतासाठी पैशांची उधळपट्टी केली जात असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे.

Exit mobile version