रस्त्यावरील सुरक्षा कठडे चोरीला

सुगवे पिंगळेवाडीतील रस्ता बनला धोकादायक
चोरट्यांवर कारवाई करण्याची मागणी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत-मुरबाड या राष्ट्रीय महामार्ग 548 अ या रस्त्यावरील सुरक्षारक्षक खांब आहेत. मुरबाड-कर्जत दिशेने सुगवे पिंगळेवाडी या भागातील रस्त्याच्या बाजूला सुरक्षा कठडे चोरीला गेले आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून चोरीला जाणाऱ्या लोखंडी बॅरिकेट्सबद्दल कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्ता काँक्रिटचा बनविला गेलेला आहे. या रस्त्यावर कर्जत तालुका हद्दीत कळंबपासून सुगवे या भागात फार तुरळक लोकवस्ती आहे. मात्र या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वळणे आहेत. त्याचवेळी रस्त्याच्या बाजूला जंगल प्रदेश आहे. त्याचा परिणाम या भागात रात्री वाहतूक करणेदेखील धोकादायक मानले जाते. अशावेळी रस्त्यावरील सुरक्षा कठडे हे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मदतगार ठरत असतात. मात्र, तेच सुरक्षा कठडे चोरीला जाण्याच्या घटना अधिक प्रमाणात दिसून येत आहे.

सुगवे पिंगळेवाडी परिसरात वाहनांच्या सुरक्षेसाठी कठडे बांधण्यात आले. मात्र, तेच कठडे आणि त्यातील लोखंडी प्लेट या चोरीला गेल्या आहेत. या चोरीला गेलेल्या प्लेटमुळे या रस्त्यावरील सुगवे पिंगळेवाडी भागातील रस्ता धोकादायक बनला आहे. त्या ठिकाणी अगदी वळणावर असलेले लोखंडी प्लेट देखील काढून नेण्यात आले असल्याने वाहनचालकांच्या गाडी थेट खाली दरीत जाऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन राज्य रस्ते विकास महामंडळांकडून अशा सुरक्षा कठडे चोरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पाऊले उचलण्याची गरज आहे.

रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून कर्जत पोलीस ठाण्यात पत्र दिल्यास ते सुरक्षा कठडे शोधण्यास यश येऊ शकते. अनेक ठिकाणी चोरून नेलेले कठडे हे काही शेतकऱ्यांच्या अंगणात तर आपल्या घरांच्या सुरक्षेसाठी तयार केलेल्या कुंपणाला बसवले आहेत, अशी माहिती आपले नाव न सांगण्याच्या अटीवर मिळाली आहे. त्यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील सुरक्षा कठडे पुन्हा मिळविण्यासाठी पोलिसात तक्रारी करायला हव्यात, अशी मागणी केली जात आहे.

Exit mobile version