ग्रामस्थांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण
जीवनावश्यक वस्तूसाठी माणगावपर्यंत पायपीट
। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील निजामपूर परिसरातील दुर्गम आणि डोंगराळ बोरमाच गावावर निसर्गाने अक्षरशः संकटाचा डोंगर कोसळवला आहे. गावालगतच्या डोंगरमाथ्यावरून प्रचंड दरड कोसळल्याने गावाकडे जाणारा एकमेव रस्ता पूर्णपणे बंद झाला असून, संपूर्ण गावाचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे.
गेल्या चार दिवसांपासून रस्त्यावर मोठमोठे दगड, माती आणि झाडांचा ढिगारा पडून असल्यामुळे कोणतेही वाहन गावात पोहोचू शकत नाही. त्यामुळे आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांसह संपूर्ण गावाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या अन्नधान्य, औषधे, दूध, गॅस आणि इतर जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी ग्रामस्थांना निजामपूर किंवा माणगावपर्यंत अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. बोरमाचमध्ये सुमारे 80 घरे असून काही कुटुंबे भीतीपोटी गाव सोडून नातेवाईकांकडे गेल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. सततच्या पावसामुळे डोंगरातून आणखी दरड कोसळण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने प्रत्येक क्षण ग्रामस्थांच्या मनात धास्ती निर्माण करत आहे. रात्रभर झोप लागत नाही; पुन्हा दरड कोसळली तर काय होईल? असा प्रश्न प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.
या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच इतर शासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून रस्ता खुला करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र दरडीचे प्रमाण मोठे असल्यामुळे अद्याप वाहतूक सुरू होऊ शकलेली नाही. ग्रामस्थांनी मंत्री भरत गोगावले यांच्याकडे तातडीने नवीन आणि सुरक्षित रस्ता निर्माण करण्याची मागणी केली आहे. या मागणीची दखल घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले असून, लवकरच स्वतः बोरमाच गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार असल्याचे सांगितले. गावकऱ्यांच्या अडचणी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
निजामपूर परिसर सह्याद्रीच्या कुशीत वसलेला असल्याने मुसळधार पावसात दरडी कोसळण्याचे प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे या भागातील डोंगरपायथ्यावरील गावांचे भवितव्य दरवर्षी पावसाच्या दयेवर अवलंबून राहते. अशा घटना टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी भू-सर्वेक्षण, संरक्षण भिंती, पाणी निचरा व्यवस्था आणि धोकादायक उतारांवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आज बोरमाचमधील प्रत्येक कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत आहे. गाव पुन्हा सुरक्षित व्हावे, रस्ता खुला व्हावा आणि भीतीच्या सावटातून मुक्ती मिळावी, हीच येथील नागरिकांची आर्त हाक आहे.







