कोट्यवधींच्या रस्त्यांचा पहिल्याच पावसात फज्जा

सार्वजनिक बांधकाम, एमएसआरडीसी विभागाचा भ्रष्ट कारभार उघड

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

पहिल्याच पावसाने रायगड जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांच्या रस्ते कामांची अक्षरशः लक्तरे काढली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था पाहता जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांच्या रस्ते विकासकामांचा भंपकपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. पावसाच्या हलक्या सरीतच 175 कोटी रुपयांच्या अलिबाग-रोहा मार्गावर ठिकठिकाणी तडे पडले असून, जलपाडा-जांभुळपाडा मार्ग निसरडा झाल्यामुळे अनेक वाहने मंगळवारी (दि.23) रस्त्यावरुन घसरल्याची धक्कादायक घटना घडली. जिल्ह्यातील अनेक जुन्या आणि नव्याने केलेल्या रस्त्याची अवस्था पाहता पहिल्याच पावसात रस्ते नाही तर संपूर्ण विकास व्यवस्थाच उघडी पडल्याचे चित्र दिसून आले.

विकासाच्या नावाखाली मोठमोठे आकडे दाखवायचे आणि प्रत्यक्षात मात्र जीवघेणे रस्ते जनतेच्या माथी मारायचे, असा संतप्त आरोप नागरिकांकडून केला जात आहे. महत्त्वाच्या मार्गांवर पडलेले खड्डे, तडे आणि घसरगुंडीमुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक दुचाकीस्वार किरकोळ अपघातात जखमी झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.


दरम्यान, स्थानिक नागरिकांचा संताप आता उफाळून आला असून, ‌‘रस्ता आहे की मृत्यूचा सापळा?’ असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. कामाचे बिल मंजूर करणारे अधिकारी, पाहणी करणारे अभियंते आणि कंत्राटदार यांच्या संगनमतामुळे रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे अशा भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. याशिवाय रस्त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशाराही नागरिकांकडून दिला जात आहे.

अधिकाऱ्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह
या सर्व परिस्थितीमुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसीच्या देखरेख यंत्रणेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. काम सुरू असताना गुणवत्ता तपासणी योग्य पद्धतीने झाली का, वापरलेले साहित्य दर्जेदार होते का आणि काम पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र चाचणी करण्यात आली का, असे अनेक प्रश्न आता पुढे येत आहेत.
काँक्रिट रस्त्यावर वाहने घसरली
कार्लेखिंड ते रेवस मार्गावरील काँक्रिटीकरणाचे काम एमएसआयडीसी या विभागामार्फत सुुरू आहे. 27 किलोमीटरचा हा रस्ता असून, या रस्त्यासाठी 188 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सध्या या रस्त्याचे 18 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. परंतु, पहिल्याच पावसात या रस्त्यावरून वाहन चालविणे धोकादायक होऊ लागले आहे. मंगळवारी सकाळी जांभुळपाडा ते जलपाडा रस्त्यावरून सुमारे दहा हून अधिक वाहने घसरून अपघात झाला. त्यामध्ये एसटी बससह टेपो व दुचाकींचा समावेश होता. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मात्र, अनेक वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

कार्लेखिंड ते रेवस मार्गावरील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 18 टक्के काम पूर्ण झाले आहे. पावसात काही वाहने घसरल्याचे समजले. सध्या वाहने सावकाश चालविण्याचे सूचना फलक लावण्यास ठेकेदाराला सांगितले आहे. नागरिकांनीदेखील योग्य सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत असून, योग्य ती उपाययोजना सुरू आहे.

बी.के. सिंह,
वरिष्ठ अधिकारी, एमएसआयडीसी
Exit mobile version