खाजगी शाळांकडून पालक वर्गाची लूट

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल, नवी मुंबई परिसरातील शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाकरता गणवेशाबरोबरच पुस्तक स्टेशनरी खरेदी करण्याचे सक्ती केली जात आहे. या माध्यमातून पालकांची लूट होत असून याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यांनी ठरवलेल्या किंमतीला तसेच इतर अवास्तव वस्तू पालकांच्या माथी मारल्या जात आहेत.

नवी मुंबई तसेच पनवेल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संकुले उभे राहिले आहेत. या संकुलांमध्ये डोनेशन त्याचबरोबर वार्षिक शुल्क तुलनेत जास्त असतानाही पालक काटकसर करून आपल्या पाल्यांना या खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेऊन देतात. वर्षभर विविध प्रकारचे शुल्क संबंधित शैक्षणिक संस्थांकडून घेतले जाते. त्याचबरोबर नवीन प्रवेशाकरता मोठ्या रकमेचे डोनेशन सुद्धा आकारले जाते. या सर्व गोष्टी आहेतच त्याचबरोबर शाळेमधूनच पुस्तक वह्या त्याचबरोबर इतर वस्तू खरेदी करण्याचा दंडक जवळपास सर्वच शाळांमधून घालण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून अशाप्रकारे पालकांवर अधिक पैशाचा भार टाकला जात आहे. शाळा ठरवतील त्याच रकमेला पुस्तक वह्या तसेच इतर शालेय उपयोगी वस्तू पालकांना खरेदी कराव्या लागत आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर राज्याच्या शिक्षण विभागाकडून अशा प्रकारची कोणतीही नियमावली तसेच नियंत्रण नसल्याने ही परिस्थिती एक प्रकारे निर्माण झाली आहे.

विक्रेत्यांची मक्तेदारी
पनवेल व नवी मुंबई परिसरातील शैक्षणिक संकुलात पुस्तक आणि स्टेशनरी विक्री करण्यासाठी एकच विक्रेता नियुक्त केला जातो. त्यांची मक्तेदारी असल्याने त्याने दिलेल्या काळातच पुस्तके आणि स्टेशनरी घेऊन जावी लागते. त्यात पालकवर्गाला एक प्रकारे वेठीस धरले जाते.

सर्व शैक्षणिक संकुलात असे प्रकार घडत नसले तरी काही शाळांमध्ये पुस्तक आणि स्टेशनरी तसेच गणवेश खरेदी करण्याची सक्ती केली जाते. त्यामुळे पालकांचा ऐच्छिक अधिकार एक प्रकारे हिरावून घेतला जातो. शुल्क नियंत्रणाबरोबर पुस्तक आणि इतर शालेय वस्तू खरेदीबाबत शिक्षण विभागाने नियमावली करण्याची आवश्यकता आहे.

सुनिता पठारे, सामाजिक कार्यकर्त्या

Exit mobile version