पनवेल | वार्ताहर |
बँकेतून काढलेली 3 लाख 50 हजारांची रोख रक्कम घेऊन जाणार्या व्यक्तीच्या हातातील रोख रक्कमेची पिशवी मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा लुटारूंनी लुटून पलायन केल्याची घटना कामोठे सेक्टर-21 मध्ये घडली. कामोठे पोलिसांनी या घटनेतील दोघा अज्ञात लुटारु विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.
या घटनेतील तक्रारदार रंगनाथ दाते (45) हा कामोठे सेक्टर-8 मध्ये कुटुंबासह राहण्यास असून त्याचा सेक्टर-21 मध्ये मनी ट्रान्स्फरचा व्यवसाय आहे. दाते याने आपल्या व्यावसायासाठी बँकेतून 3 लाख 50 हजार रुपये काढले हेते. त्यानंतर सदरची रक्कम घेऊन तो कारमधुन आपल्या ऑफिस जवळ पोहोचल्यानंतर रोख रक्कमेची पिशवी घेऊन तो कार्यालयाच्या दिशेने जात होता. याचवेळी मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा लुटारुंनी त्याच्या हातातील 3 लाख 50 हजाराची रोख रक्कम असलेली पिशवी जबरदस्तीने लुटून पलायन केले. यावेळी दाते याने आरडा-ओरड करत सदर लुटारूंचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दोघे लुटारु एम.एन.आर.कॉलेजच्या दिशेने भरधाव वेगात पळून गेले. या घटनेनंतर रंगनाथ दाते याने कामोठे पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.