कामगारांना घरी वेळेवर पोहचण्यास उशीर
| पनवेल | प्रतिनिधी |
अनेक वर्षांपासून सुरळीत वेळेवर चालणाऱ्या 01348 रोहा-दिवा मेमू रेल्वेच्या सायंकाळच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. मागील तीन महिन्यांपूर्वी (नोव्हेंबर) रेल्वे प्रशासनाने केलेल्या या बदलामुळे या रेल्वेवर अवलंबून असलेल्या कामगारांना कामावरुन घरी परतण्यासाठी तब्बल एक ते सव्वातास प्रतिक्षेचा प्रवास करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने त्यांच्या सुधारीत वेळापत्रकाचा पुनर्विचार करावा, असे पत्र पनवेल प्रवासी संघटनेकडून मध्य रेल्वे प्रशासनाला दिले आहे. परंतु तीन महिन्यानंतरही कामगार प्रवाशांना कोणताही दिलासा रेल्वे प्रशासनाने दिला नाही.
कोकण रेल्वे मार्गावर विविध कामे सुरु आहेत. पूर्वीपेक्षा सध्या या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या अधिक असल्याने आणि रुळांची नवीन कामे सुरु असल्याने सुधारीत वेळापत्रक बदलल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या जनसंपर्क विभागाने दिली. परंतु, रोहा-दिवा मेमू रेल्वेच्या माफक तिकीट दरामुळे या रेल्वेवर सायंकाळच्या सुमारास शेकडो कामगार अवलंबून आहेत. कंपनीचे काम संपवून घरी पोहोचणारे नागोठणे, पेण, रसायनी, तळोजा, कळंबोली या औद्योगिक वसाहतींमधील कामगारांना ही रेल्वेसेवा महत्वाची आहे.
यापूर्वी (नोव्हेंबर महिन्याच्या पूर्वी) नावडे स्थानकात रोहा-दिवा ही रेल्वे सायंकाळी 6 वाजून 7 मिनिटांनी पोहोचत होती. मात्र, सुधारीत वेळापत्रकानुसार 7 वाजून 3 मिनिटांनी येणारी रेल्वे गाडी सध्या सव्वासात-साडेसात वाजता पोहोचते. त्यामुळे कामगारांना कामावरुन घरी परतण्यासाठी रेल्वेची तासभर प्रतिक्षा करावी लागत आहे. प्रतिक्षेचा प्रवास बंद होऊन पूर्वीप्रमाणे रेल्वेप्रशासनाने या मार्गावर रेल्वेसेवा सुरु करावी, या मागणीसाठी तळोजा औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांची संघटनेने रेल्वे प्रशासन आणि पनवेल प्रवासी संघाकडे पत्र व्यवहार केला आहे. पनवेल प्रवासी संघाने या प्रश्नावर मध्य रेल्वेच्या प्रशासनासमोर कामगार प्रवाशांची व्यथा मांडली. मात्र, तीन महिने उलटले तरी कोणताही दिलासा कामगार प्रवाशांना मिळालेला नाही.