बेकायदेशीर पाणी घेणाऱ्यांवर रोहा न.पा.कडून होणार कारवाई

नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन; दंड वसूल करण्याचा दिला इशारा

| रोहा | प्रतिनिधी |

नगरपालिकेकडून पुरवठा करण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नळाला थेट विजेचा पंप लावून बेकायदेशीररित्या पाणी घेण्याचे प्रकार सरार्सपणे घडत आहेत. या नियमबाह्य आणि अनधिकृत पाणी चोरीमुळे रोहे अष्टमी शहरातील त्या-त्या भागातील पाणी पुरवठ्यावर गंभीर परिणाम होत आहे. सदर नियमबाह्य विजेचा पंपाचा वापर करणे बंद न केल्यास त्या ग्राहकांवर नगर परिषद प्रशासनाकडून दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पत्रकद्वारे तसेच दवंडीद्वारे नगर पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

रोहे अष्टमी भागात बेकायदेशीरपणे विजेचा पंपाचा वापर होत असल्याने संबधित भागात कमी दाबाने अथवा पाणी पुरवठा न होणे अशा तक्रारी नगर पालिकेकडे प्राप्त झाल्यानंतर नगर पालिकेने नियमबाह्य पद्धतीने पाणी घेणाऱ्या ग्राहकांविरोधात धडक मोहिम हाती घेतली आहे. बेकायदेशीर विजेचे पंप वापरून नियमबाह्य पाणी घेण्याचे प्रकार थांबविण्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून विशेष पथक तयार करण्यात आले आहेत. या विशेष पाथकांच्या माध्यमातून बेकायदेशीर विजेचे पंप बंद करण्याची व पंप जप्त करण्याची कार्यवाही हाती घेण्यात येणार आहे. या कार्यवाही दरम्यान थेट नळ संयोजनाला वीज पंप जोडून पाणी घेत असल्याचे आढळून आल्यास संबधित वीज पंप तात्काळ जप्त करण्यात येणार आहे. नगरपालिके मार्फत पंप जप्त केल्यानंतरही पुन्हा विजेचा पंप जोडून पाणी घेत असल्याचे निदर्शनास आल्यास सदर पंप जप्त करुन 5 हजार रु.दांडात्मक कारवाई व संबधित व्यक्ति विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी व ग्राहकांनी तात्काळ दक्षता घेऊन नियमबाह्य वीज पंप काढून नगर पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे, मुख्यधिकारी अजयकुमार एडके, उपाध्यक्ष अहमद दर्जी व पाणी पुरवठा सभापती महेंद्र दिवेकर यांनी केले आहे. या बाबत नगर पालिकेकडून आज जाहीर आवाहन करणारे पत्रक सर्वत्र वाटप करण्यात आले आहे. तर प्रशासन व लोकप्रतिनिधी कडून देखील सोशल मीडियाद्वारे जनतेला आवाहन केले आहे.

रोहा-अष्टमी नगरपरिषद हद्दीत पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर वाढता ताण लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन केले आहे.शहरात सध्या उपलब्ध पाणीपुरवठा मर्यादित असून अनावश्यक वापरामुळे भविष्यात पाण्याची टंचाईची निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पालिकेकडून पुरवठा होणाऱ्या पाण्यातून वाहन धुणे, अंगण धुणे, कपडे धुणे, बाथरूममध्ये अनावश्यक पाणी सोडणे तसेच नळ खुले ठेवणे यांसारख्या प्रकारांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी नागरिकांनी नळाला फ्लोटिंग बॉल कॉक बसवणे,पाण्याच्या टाक्यांची वेळोवेळी तपासणी करणे, गळती त्वरित दुरुस्त करणे, तसेच घरगुती वापरात पाण्याचा गरजे पुरता वापर करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शहरातील नागरिकांनी पाणी वाचवा, भविष्य वाचवा या संदेशाची जाणीव ठेवून दररोजच्या वापरात बचतीची सवय लावावी असे आवाहन करण्यात आले आहे. पाणी हा अमूल्य नैसर्गिक स्रोत असून त्याचे संवर्धन व योग्य व्यवस्थापन केल्यासच भविष्यातील पाणीटंचाई टाळता येईल असा विश्वास नगरपरिषद प्रशासनाने व्यक्त केला आहे.
पहिल्यांदा नियमभंग केल्यास दंड आकारला जाईल तर वारंवार नियम मोडल्यास अधिक कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. पाण्याचा अपव्यय रोखणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी असल्याचेही नगरपरिषदेकडून नमूद करण्यात आले आहे.
Exit mobile version