उसर मार्गे रोहा रस्त्याचे काम सुरू; शेकाप नेत्यांच्या प्रयत्नांना यश

। रोहा । प्रतिनिधी ।
चणेरा उसर मार्गे रोहा या रस्त्याचे काम व्हावे अशी बिरवाडी, पांगळोली, ठाकूरवाडी, टेपरी, केळदवाडी, उसर या गावातील नागरिकांची अनेक वर्षांपासून मागणी होती. या रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी शेकाप माजी आ.पंडीत पाटील यांनी या रस्त्याने स्वतः प्रवास करत रस्त्याची दुरावस्था जाणून घेतली होती. त्यानंतर शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी या रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा केला होता. राज्य सरकारच्या 2021-22 अर्थसंकल्पात या रस्त्याच्या कामासाठी साडे पाच कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आल्याने चणेरा ते उसर या साडे नऊ किमी रस्त्याचे काम होणार असल्याने विभागातील नागरिकांनी शेकाप नेतृत्वाला धन्यवाद दिले आहेत.
सदर रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी काहींनी गल्लीतील रस्त्याची दिल्लीने घेतली दखल अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. सदर रस्ता हा पूर्वी इतर जिल्हा मार्ग 105 म्हणून ओळखला जात होता. 2017 साली सदर रस्ता दर्जा उन्नत करून त्याला प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 80 म्हणून दर्जा देण्यात आल्याने सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत आला होता. रोहा तालुका शेकाप कार्यालयीन चिटणीस जितेंद्र जोशी तसेच खांबेरे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य या रस्त्याच्या कामासाठी सतत आग्रही होते. या रस्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून पावसाळ्यानंतर या कामाला वेगाने सुरुवात होणार आहे. चणेरा ते बिरवाडी मार्गावर मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरावस्था झाल्याने या मार्गावर बीबीएमच्या कामाला संबंधित एजन्सीकडून सुरुवात करण्यात आली असल्याने नागरिक शेकाप नेते जयंत पाटील, पंडीत पाटील, आस्वाद पाटील यांना धन्यवाद देत आहेत.

Exit mobile version