रोहा तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश

शेतकरी जनआंदोलन समन्वय समितीच्या मागण्यांची दखल

| रोहा | प्रतिनिधी |

शेतकरी जनआंदोलन समन्वय समितीच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला अखेर यश आले आहे. समितीने वरिष्ठ पातळीवर सादर केलेल्या निवेदनाची शासनाने दखल घेत रोहा तालुक्याचा राज्याच्या दुष्काळी यादीत समावेश केला आहे. तसेच पाच प्रमुख पिकांचा नुकसान यादीत समावेश आणि चणेरा भागातील म्हसाडी धरणासाठी निधी मंजूर करण्याच्या मागण्यांनाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या निर्णयामुळे शेतकरी वर्ग आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

रोहा तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करावा, म्हसाडी धरणाच्या कामाला प्रारंभ करून कामाचे स्वरूप स्पष्ट करावे, अशा प्रमुख मागण्या समितीने केल्या होत्या. या मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. अखेर शासनाने दखल घेतल्याने समितीच्या प्रयत्नांना यश आले आहे. याकामी समन्वय समितीचे प्रमुख विनायक धामणे, किशोर मोरे, बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, संस्थापक राजेंद्र जाधव, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ कडू, दगडू बामुगडे, प्रेस क्लबचे अध्यक्ष श्याम लोखंडे, खेळू थिटे, धर्मा कोळी, शशिकांत शिंगरे यांच्यासह शेतकरी प्रतिनिधींनी मेहनत घेतली.

Exit mobile version