रोह्याचे प्रवेशद्वार जिर्ण अवस्थेत; नगरपरिषदेचे दुर्लक्ष

। रोहा । वार्ताहर ।
रोहा शहरात येताना सी.डी.देशमुख यांच्या नावाने असलेले प्रवेशद्वाराची जिर्ण अवस्था झाली आहे. केवळ लोखंडी सांगाडा राहिला असून संबंधितांचे या प्रवेशद्वाराकडे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. तरी नगरपरिषदेने या प्रवेशद्वाराची तातडीने डागडुजी करावी अशी मागणी रोहेकर करीत आहेत. कोकणी संस्कृतीवर प्रचंड प्रेम असलेल्या सी.डीं.देशमुखांनी आपल्या लंडन येथील बंगल्याला रोहा हे नाव दिले होते. पण रोह्यावर नितांत प्रेम करणार्‍या डॉ.चिंतामणराव देशमुख यांचे रोह्यातील प्रवेशद्वार मात्र उपेक्षित असल्याने रोहेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. माजी नगराध्यक्ष दिलीप राजे आणि अवधूत तटकरे रोह्याचे नगराध्यक्ष असताना खारापटी रोहा मार्गावर अष्टमी येथे प.पू.पांडुंरंग शास्त्री आठवले यांच्या नावे प्रवेशद्वार आणि रोहा कोलाड मार्गावर दमखाडी येथे डॉ.चिंतामणराव देशमुख यांच्या नावे प्रवेशद्वार उभारण्यात आले होते. कालांतराने ते जिर्णही झाले. विद्यमान नगपरिषदेने सी.डीं.च्या नावे असलेले प्रवेशद्वार वगळता बाकी ठिकाणी प्रवेशद्वारे उभारली मात्र डॉ.चिंतामणराव देशमुख यांचे नावे असलेले प्रवेशद्वार जिर्ण अवस्थेत ठेवले आहे. दरम्यान, त्यांच्या 125व्या जन्मवर्षाचे औचित्य साधून विद्यमान नगरपरिषदेने या उपेक्षित प्रवेशद्वाराला न्याय द्यावा आणि त्यांच्या नावाला शोभेल असे आकर्षक डिझाईन तयार करून सिडींचा सन्मान करावा अशी मागणी होत आहे.

Exit mobile version