नराधमाला फाशी देण्याची मागणी
। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील वरसे येथील एका नराधमाने 11 वर्षीय चिमुरडीवर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच या कठीण प्रसंगी अल्पवयीन मुलीला व तीच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी रोहेकरांनी शुक्रवारी (दि.10) सायंकाळी रस्त्यावर उतरून मूक मोर्चाद्वारे आपला संताप व्यक्त केला. सद्यास्थित महिला, तरुणी व अल्पवयीन सूरक्षित नाही. असे संपातजनक प्रकार थोपविण्यासाठी शासनाला अपयश आले आहे. या वृतीला पोलीस प्रशासनाने ठेचून काढले पाहिजे. म्हणून या नराधमाला भरचौकात फाशी द्या, अशी मागणी संतप्त महिलांनी केली.
वरसे गावातील एका अल्पवयीन चिमुरडीवर नात्याने काका असलेल्या व वासनेने पछाडलेल्या तेजस पडवळ या आरोपीने लैंगिक अत्याचर केल्याची घटना घडल्याने सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. संतप्त ग्रामस्थांनी मोर्चा काढल्यानंतर पोलिस यंत्रणा कामाला लागली आणि तात्काळ आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या निंदनीय घटनेचा निषेध आणि पीडित मुलीला व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळावा त्याचप्रमाणे आरोपीला भरचौकात फाशी द्यावी, या मागणीसाठी शुक्रवारी वरसे नाक्यापासून दमखाडी नाका, रोहा शहर ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मूक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्यात शेकडोच्या संख्याने रोहेकर नागरिक उपस्थित होते. विशेषतः महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती.