| रायगड | प्रतिनिधी |
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी सहा एप्रिल रोजी सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीमध्ये प्रवेश जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी, प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार असून, सोडतीनंतर शाळांतील प्रत्यक्ष प्रवेश सुरू केले जाणार आहेत.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली. ‘आरटीई’ 25 टक्के प्रवेशासाठी विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरच्या अंतरातील शाळा निवडण्याची शिक्षण विभागाने घातलेली अट उच्च न्यायालयाने रद्द केली. त्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आधी अर्ज भरलेल्या पालकांना पुन्हा अर्ज भरण्यासाठी, तसेच अर्ज न भरलेल्या पालकांना अर्ज भरण्याची संधी दिली.
यंदा आरटीई प्रवेशांसाठी राज्यातील 8 हजार 701 शाळांमध्ये 1 लाख 14 हजार 826 जागा उपलब्ध आहेत. अर्ज भरण्यासाठी 31 मार्चपर्यंत दिलेल्या मुदतीमध्ये 2 लाख 89 हजार 498 अर्ज दाखल झाले. गेल्या वर्षी 3 लाख 5 हजार 151 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आरटीईच्या अर्जांमध्ये घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सोडत सोमवारी (6 एप्रिल) महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे शिक्षण आयुक्तांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. सोडतीचे थेट प्रक्षेपण यूट्युबवर केले जाणार आहे. सोडत काढून प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची शाळानिहाय यादी जाहीर केली जाणार आहे.
गैरप्रकारांबाबत तक्रार करण्याचे आवाहन
आरटीई प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप केला जात नाही. पालकांना पाल्यांच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारची प्रलोभने दिले जात असल्यास अशा प्रलोभनांना बळी पडू नये. प्रवेशाबाबत कोणतेही गैरप्रकार निदर्शनास आल्यास जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, महापालिका, नगरपालिका प्रशासन अधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय , शिक्षण आयुक्त यांच्याकडे समक्ष किंवा ई-मेलद्वारे पुराव्यासह तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेत गैरप्रकार आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
