प्रा.शिक्षक पतपेढीत लवकरच आरटीजीएस, एनइएफटी सुविधा

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचा कारभार यापुढे संगणकावर चालणार आहे. सर्व शाखा आता संगणकीकृत झाल्या आहेत. पुढील काही दिवसात पतपेढीत आरटीजीएस व एनइएफटी अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील अशी घोषणा पतसंसथेचे अध्यक्ष राजेश सुर्वे यांनी दिली.
पतपेढीच्या अलिबाग,महाड,माणगाव या शाखेच्या सभासदांचा मेळावा नुकताच महाड येथे पार पडला. यावेळी अध्यक्ष सुर्वे यांनी पतसंस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. पतसंस्थेत आता ऑनलाइन सुविधा दिल्या जाणार आहे. कारभार पेपरलेस करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आरटीजीएस किंवा एनइएफटी सारख्या सुविधांमुळे सभासदांचा वेळ पैसा यांची बचत होईल शिवाय जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना याचा लाभ मिळणार आहे.
पतसंस्थेने यंदा 97 व्या वर्षात पदार्पण केले आहे. सभासदांना 25 लाख रूपयांपर्यंत कर्ज दिले जाते. मृत्यूफंड योजना हे खास वैशिष्टय आहे. सभासदाच्या वारसाला मयत झाल्यास 10 लाखांची मदत केली जाते. दुर्धर आजारासाठी 15 हजार रूपये विनापरतावा दिले जातात. सभासदांना 10 ते 12 टक्के पर्यंत लाभांश दिला जात असून, कायम ऑडीट ‘अ’ वर्ग मिळाला आहे. सभासद कर्जदार यांचा व्यक्तीगत विमा व असा एकत्रित करून आजपर्यंत 93 लाखापर्यंत मृत्यूफंड पोहोचल्याचे सांगितले. त्याचबरोबर भारतीय जीवन विमा सोबत करार करून संस्थेच्या सभासदांना व्यक्तीगत विमा संस्थेने चालू केला असल्याचे सुर्वे यांनी सांगितले. आगामी काळात मृत्यु फंडाची रक्कम वाढवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न लता मंगेशकर, अभिनेते रमेश देव व ज्ञात-अज्ञात मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सर्व मान्यवरांचे उपस्थित सभासदांच्या वतीने स्वागत करण्यात आले. संस्थेच्या ठेवीदार म्हणून माया कुचेकर, बळीराम साळवी, तसेच महाड व माणगाव तालुक्यातील सर्व शिक्षक बंधूंना विपषनेचे प्रशिक्षण दिल्याबद्दल मनीषा लावरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सभासदांना संगणकीकृत पासबुकचे वितरण करण्यात आले. पूजा शहा, दिनेश गावंड, मनीषा लावरे, माया कुचेकर, किसनदेव यमगर, प्रशांत तुळसुळकर, स्मिता नवघरे, श्याम आवळे, प्रदीप शिंदे, सुधीर मांडवकर,बळीराम साळवी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

Exit mobile version