। पनवेल । प्रतिनिधी ।
तळोजा औद्योगिक वसाहतीत क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केल्यानंतर आरटीओच्या अधिकाऱ्याला धमकावत मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाच्या भरारी पथकाकडून तळोजा औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्त्यावर ॲपकोटेक्स कंपनीसमोर वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येत होती. यावेळी एमएच-46-एफ-2641 क्रमांकाच्या वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीत वाहनातून निर्धारित क्षमतेपेक्षा चार टन अधिक वजनाची वाहतूक होत असल्याचे आढळून आले.
तसेच वाहनाची कागदपत्रे तपासल्यानंतर मार्च 2023 पासून वाहन कर भरलेला नसल्याचे उघड झाले. याशिवाय प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, विमा, योग्यता प्रमाणपत्र, परवाना आणि राष्ट्रीय परवाना अधिकृततेची मुदत संपल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे आरटीओच्या भरारी पथकाने ई-चलनद्वारे 50 हजार 500 रुपयांचे तडजोड शुल्क आकारून कारवाई केली.
या कारवाईमुळे संतप्त झालेल्या वाशी येथील सेक्टर-11 मधील रहिवासी नितीन रॉय (25) याने संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांशी वाद घालत त्यांना मारहाण केल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. तसेच अधिकाऱ्यांना जातीवाचक शिवीगाळीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच तळोजा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अजयकुमार मोहिते यांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तळोजा पोलीस करीत आहेत.
आरटीओ अधिकाऱ्याला मारहाण; आरोपीला पोलीस कोठडी
