पेण येथे लवकरच सुविधाः रायगडकरांची गैरसोय टळणार
। पेण । वार्ताहर ।
आरटीओ कार्यालयाबरोबरच कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये नोंदणी करून देखील ही सुविधा मिळविता येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने सिम्युलेटर मशिन्स आरटीओ कार्यालयात उपलब्ध करून दिले आहेत. पेण आरटीओमध्ये जागेअभावी सध्या हे मशिन्स उपलब्ध नसले तरी लवकरच ही सुविधा रायगडकरांसाठी उपलब्ध होणार आहे.
पेण येथील रायगड आरटीओ कार्यालयात पेण, अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, माणगाव, महाड, पोलादपूर, म्हसळा, सुधागड, रोहा या तालुक्यांचा समावेश होतो. या कार्यालयातून दररोज चारचाकी, दुचाकी, दर दिवशी 75 ते 80 एवढया ड्रायव्हिंग टेस्ट केल्या जातात. पेण आरटीओ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात महिनाभरात 2500 ते 3000 ड्रायव्हिंग टेस्ट केल्या जातात. मात्र हा वेग आता वाढणार कारण केंद्र शासनाकडून प्रत्येक आरटीओ कार्यालयाला सिम्युलेटर मशिन्स देण्यात आले आहे. पेण कार्यालयात जागेअभावी हे मशीन बसविलीले नाही परंतु नजीकच्या काळात ही मशीन बसविली जाईल. उमेदवाराला वाहन चालविताना आवश्यक असलेल्या वाहतूक नियमांच माहितीसाठी या मशीचा वापर होणार आहे.
केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार आरटीओ कार्यालय व मान्यप्राप्त ड्रायव्हिंग स्कूलमध्ये सिम्युलेटर मशिन्स उपलब्ध करून दिल्या आहेत. या मशीनवरील स्क्रीनवर ड्रायव्हिंगबाबत प्राथमिक माहिती, वाहतुकीचे नियम हे चालकाला शिकविले जाणार आहेत. त्या उमेदवाराची प्रत्यक्षात रस्त्यावर वाहन चाचणी घेतली जाणार व शारीरिक चाचणी घेतल्यानंतर त्यामध्ये उमेदवार पास झाल्यानंतर त्याला पक्के लायसन्स जारी करण्यात येणार आहे.
या मशीनच्या चाचणीत पास व नापास याच्याशी वाहन चालविण्याचा परवाना देण्याबाबत संबंध नाही. प्रत्यक्षात रस्त्यावरील वाहन चालविण्याची चाचणी व शारीरिक चाचणीमध्ये उमेद्वार उत्तीर्ण झाल्यानंतरच वाहन चालविण्याचा परवाना दिला जाईल.परंतु मशीनमुळे ड्रायव्हिंग टेस्ट घेण्याचा वेग वाढून परवानधारक संख्या देखील वाढेल.
- महेश देवकाते, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण रायगड