। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणी कमी होताना दिसत नसून, मुंबई सत्र न्यायालयाने दरेकरांनी दाखल केलेला अटकपूर्व जमीनाचा अर्ज फेटाळून लावला आहे. मुंबै बँकेच्या निवडणुकीत मजूर दाखवल्याचे हे प्रकरण आहे. दरम्यान, न्यायालयाने उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी 29 मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम ठेवले आहे. यामुळे दरेकरांची अटक तूर्तास टळली आहे.
या प्रकरणी सरकारतर्फे करण्यात आलेल्या युक्तीवादात म्हटले होते की, दरेकरांनी खोटी माहिती दिलेली आहे. त्यामुळे या प्रकरणी त्यांना अटक करून चौकशी करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सरकारी पक्षाकडून करण्यात आलेला हा दावा न्यायालयाने कुठेतरी ग्राह्य धरल्याचे आज फेटाळून लावलेल्या निर्णयानंतर दिसून येत आहे. या प्रकरणातील जी माहिती आहे ती दरेकर स्वतःहून पुढे येत देत नाहीयेत. तसेच पुरावेदेखील उपलब्ध करून दिले जात नसून, तपास यंत्रणांना सहकार्य होत नसल्याचा युक्तीवाद सरकारी पक्षातर्फे न्यायालयात मांडण्यात आला आहे.