गुजराती वाहिनीवर 20 ऑगस्ट रोजी प्रसारित करण्यात आलेला व्हिडीओ केला जात आहे व्हायरल
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल ग्रामीण (वा) कर्नाळा पक्षी अभयारण्य परिसरतील पेट्रोल पंपावर एक सिंह मुक्तसंचार करत असल्याचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर फिरवला जात आहे. अभयारण्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावरील नायरा कंपनीच्या पेट्रोल पंपावरील कामगाराने हा व्हिडीओ बनवल्याचे सांगितले जात आहे. या बाबत अधिक माहिती घेतली असता हा व्हिडीओ कर्नाळा पक्षी अभयारण्य परिसरातील नसून, गुजरातमधील असल्याची माहिती प्राप्त झाली असून, जिएसटीव्ही या गुजराती वाहिनीवर 20 ऑगस्ट रोजी हा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला असल्याचे पाहायला मिळते.
पनवेलपासून हाकेच्या अंतरावर असलेले कर्नाळा पक्षी अभयारण्य पक्षांचे नंदनवन समजले जाते. अनेक प्रजातीचे पक्षी या अरण्यात पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे वृक्ष आणि वेली अरण्य परिसरात असून येथील निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक कर्नाळ्यात येत असतात. कर्नाळा पक्षी अरण्यात दरवर्षी पक्षी आणि प्राण्यांची गणना केली जात असते. यामध्ये विविध प्रजातीची माकडे, वानरे, रान डुक्कर, भेकर, ससे, दुर्मिळ प्रजातीचे रान मांजर असे प्राणी आरण्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पूर्वी बिबट्याचादेखील वावर कर्नाळ्यात असल्याचे काहींचे म्हणणे असले तरी नजदिकच्या काळात कर्नाळा अभयारण्यात बिबटया आढळून आलेला नाही. अशा वेळी पक्षी अभयारण्यात सिंह आल्याची अफवा पसरल्याने अभयारण्य परिसराला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
पसरलेल्या अफवेची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला असता कर्नाळा येथील व्हिडीओ असल्याचे सांगत पसरवला जात असलेला हा व्हिडीओ गुजरातमधील असल्याचे पाहायला मिळाले असून, अशा स्वरूपाचे अनेक व्हिडीओ वेगवेगळ्या भाषेत प्रसारित करण्यात आले आहेत.