धाटावमधील ‘साधना’ कंपनीत कामगारांचा संताप
| धाटाव | सत्यप्रसाद आडाव |
धाटाव औद्योगिक क्षेत्रातील ‘साधना’ कंपनीत कामगारांच्या पगाराचा प्रश्न चिघळला असून, तब्बल सात महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कामगार हवालदिल झाले आहेत. थकीत पगारामुळे अर्ध्याहून अधिक कामगारांनी नोकरी सोडल्याची माहिती समोर आली असून, उरलेल्या कामगारांमध्येही तीव्र नाराजीचे वातावरण आहे. पगाराचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा कामगारांकडून देण्यात आला आहे.
धाटाव औद्योगिक क्षेत्रातील प्रख्यात ‘साधना’ कंपनीत गेल्या सात महिन्यांपासून कामगारांचे पगार थकीत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हक्काचा पगार वेळेवर मिळण्याऐवजी किती महिन्यांचा पगार बाकी आहे याची मोजदाद करण्याची वेळ कामगारांवर आली आहे. त्यामुळे अनेक कामगारांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत पूर्वी सुमारे 50 ते 60 कामगार व कर्मचारी कार्यरत होते. मात्र, पगाराच्या सततच्या विलंबामुळे त्यापैकी निम्म्याहून अधिक कामगारांनी राजीनामा दिला आहे. सध्या कंपनीत केवळ 25 ते 30 कामगार उरले असून, उत्पादन प्रक्रियेवर त्याचा परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.
पगार न मिळाल्यामुळे काही कामगारांनी इतर कंपन्यांकडे नोकरी धरली आहे, तर काहींनी छोटा व्यवसाय सुरू करण्याचा मार्ग निवडला आहे. अनेक कामगार रोजगाराच्या शोधात महाड एमआयडीसीसह इतर औद्योगिक क्षेत्रांकडे वळले आहेत. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कंपनी प्रशासन, मालक आणि कामगार यांच्यात अनेक वेळा बैठका झाल्या. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतरही कामगारांच्या हातात अद्याप पगार पडलेला नाही. कामगारांचे म्हणणे आहे की कंपनी प्रशासनाकडून वारंवार आश्वासने दिली जात आहेत, मात्र प्रत्यक्षात पगाराचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे थकीत पगार तात्काळ द्यावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा कामगारांनी दिला आहे.
सुमारे दीड वर्षांपूर्वी कंपनीत झालेल्या अपघातामुळे काही काळ कारखाना बंद होता आणि त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. मात्र, आता पंधरा दिवसांपूर्वी कारखाना पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे टप्प्या-टप्प्याने कामगारांचे थकीत पगार देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या महिन्यात किमान दोन महिन्यांचे वेतन देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
विद्याधर बेडेकर,
वरिष्ठ अधिकारी, साधना कंपनी
