तडीपार गुन्हेगाराकडून गांजा विक्री

| पनवेल | प्रतिनिधी |

हद्दपारीचा आदेश असतानाही पनवेल तालुक्यात वास्तव्य करणाऱ्या गुन्हेगाराला पनवेल तालुका पोलिसांनी गांजासह अटक केली आहे. बावंजे गावातील हाजी मलंग रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली. सुभाष दत्तू माळी असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून, त्याच्याकडून 623 ग्रॅम गांजा, तीन चिलीम आणि एक माचिस असा एकूण 32 हजार 150 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष माळी याला यापूर्वी ठाणे शहर, मुंबई, बृहन्मुंबई, नवी मुंबई, रायगड आणि पालघर या परिसरांतून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते. मात्र, हद्दपारीचा आदेश असतानाही तो पनवेल तालुक्यात वास्तव्यास होता. दरम्यान, बावंजे येथील हाजी मलंग रोड परिसरात संशयित हालचालींची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी आरोपीकडे गांजा आणि त्याच्याशी संबंधित साहित्य आढळून आले. यावेळी जप्त केलेला गांजा ओडिशा येथील नारायण नावाच्या व्यक्तीकडून आणल्याचे त्यानी सांगितले.

Exit mobile version