गुन्हेगारांचा माग घेणारी पावले थांबली; मात्र कर्तव्यनिष्ठेची अमिट छाप कायम
| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |
गणवेश नव्हता, बोलता येत नव्हते; मात्र कर्तव्याची जाण आणि गुन्हेगारांचा माग काढण्याची विलक्षण क्षमता होती. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रायगड पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून तब्बल सात वर्षे सेवा बजावणारा श्वान पथकातील विश्वासू सहकारी ‘ऑस्कर’ अखेर काळाच्या पडद्याआड गेला. त्याच्या निधनाने रायगड पोलीस दलाने केवळ एक प्रशिक्षित श्वान नव्हे, तर निष्ठावान सहकारी, विश्वासू मित्र आणि कर्तव्यनिष्ठ योद्धा गमावला आहे.
रायगड पोलीस दलाच्या श्वान पथकातील ऑस्करने आपल्या तीक्ष्ण घ्राणशक्तीच्या जोरावर अनेक गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना मोलाची मदत केली. चोरी, घरफोडी, दरोडे तसेच विविध गंभीर गुन्ह्यांच्या घटनास्थळी मिळालेले सुगावे शोधणे, संशयितांचा माग काढणे आणि तपासाला योग्य दिशा देण्यात त्याची भूमिका अनेकदा निर्णायक ठरली.
सात वर्षांच्या सेवाकाळात तब्बल 194 गुन्ह्यांच्या तपासात ऑस्करने सक्रिय सहभाग नोंदवला. तपासात अडथळे निर्माण झाले किंवा महत्त्वाचे धागेदोरे हाती लागत नसताना त्याच्या असामान्य क्षमतेमुळे पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. त्यामुळे ऑस्कर हा रायगड पोलीस दलासाठी केवळ श्वान पथकाचा सदस्य नव्हता, तर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी झटणारा चार पायांचा निःशब्द योद्धा होता.
निष्ठा, शिस्त आणि कर्तव्याप्रती असलेले समर्पण यामुळे ऑस्करने अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. प्रत्येक मोहिमेत उत्साहाने सहभागी होणारा ऑस्कर अनेक कर्मचाऱ्यांसाठी कुटुंबातील सदस्यासारखाच झाला होता. त्यामुळे त्याच्या निधनाची बातमी समजताच रायगड पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात आली.
ऑस्करने आपल्या सात वर्षांच्या सेवेत दिलेले योगदान आणि दाखवलेली कर्तव्यनिष्ठा पोलीस दलाच्या स्मरणात कायम राहणार आहे. बोलता येत नव्हते, पण आपल्या कृतीतून कर्तव्याची भाषा शिकवून जाणाऱ्या या निःशब्द प्रहरीला रायगड पोलीस दलाच्यावतीने पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. ऑस्करची पावले थांबली; पण त्याची निष्ठा, पराक्रम आणि सेवाभाव रायगड पोलीस दलाच्या इतिहासात कायम अजरामर राहील.
