| मुंबई | वार्ताहर |
लाठीमार करणारे शिंदे, फडणवीस आणि अजित पवार नव्हते. यंत्रणा आणि यंत्रणेतली माणस परिपक्व बुद्धीतली असतीलच असे नाही. समजा लाठीमार ज्यांनी केला ते पोलीसही वाईट वृत्तीचे आहेत असे म्हणण्याची आवश्यकता नाही. कुठल्याही चांगल्याही व्यक्तीला हे वाटणार नाही की आंदोलनकर्त्यांना झोडपले पाहिजे, असा युक्तीवाद शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी केला आहे.
संभाजी भिडे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्या प्रसंगी ते बोलत होते. आत्ता असलेले सरकार हे प्रामाणिक आहे. त्यांनी तुम्हाला जे आश्वासन दिले आहे ते पूर्ण करून घेण्याची जबाबदारी माझी असेल. तुम्ही उपोषण मागे घ्या आणि लढा सुरू ठेवा आम्ही सगळे तुमच्या पाठिशी आहोत असा शब्द भिडे यांनी दिला. याचवेळी त्यांनी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांचंही कौतुक केले. ही माणसं शब्द फिरवणारी नाहीत हे लक्षात घ्या असेही सांगायला ते विसरले नाहीत. आमच्यासाठी आरक्षण महत्त्वाचे आहे, कुणीही द्या. आज भिडे गुरुजींनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आमची ताकद वाढते आहे. कुणीही आले तरीही आम्ही त्यांचा पाठिंबा स्वीकारणारच. एकाचा पाठिंबा घ्यायचा आणि दुसर्याचा नाकारायचा हे आमचे धोरण नाही. असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.