दाऊदच्या बंगल्यात सनातन पाठशाळा

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
खेड तालुक्यातील मुंबके येथील डॉन दाऊद इब्राहीमच्या मालमत्तेची अस्तित्व पुसले गेले असून अ‍ॅड.अजय श्रीवास्तव यांनी खरेदी केलेल्या या बंगल्याचे नामकरण चित्रगुप्त भवन, असे करण्यात आले आहे. या वास्तूमध्ये बालकांसाठी सनातन पाठशाळा सुरू करण्यात येणार आहे. कुविख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे मूळ गाव असलेल्या मुंबके येथील दुमजली बंगल्याची 11 लाख 30 हजारांची बोली लावत विकत घेणार्‍या दिल्लीतील अजय श्रीवास्तव यांनी येथील तहसील कार्यालयात रजिस्टर प्रक्रिया पूर्ण करून मालमत्तेचा ताबा घेतला. या वास्तूचे नुतनीकरण करून येथे लहान मुलांसाठी शाळा, लहान मुलांसाठी संस्कार वर्ग सुरू होणार आहे. यासाठी सनातन धर्म पाठशाळा ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे. सनातन पाठशाळा सुरू करण्याबाबतचा फलकही लावण्यात आला आहे, अशी माहिती स्वतः अ‍ॅड. श्रीवास्तव यांनी माध्यमांना दिली आहे. गुन्हेगारी जगतात अधिराज्य गाजवणारा दाऊद मुंबईतील 1993 साली झालेल्या स्पोटक हल्ल्यानंतर चर्चेत आला. त्याला 9 ते 10 भावंडे असल्याचे मुंबकेतील ग्रामस्थ सांगतात. त्याच्या एका बहिणीचे जगबुडी नदीत बुडून निधन झाल्यानंतर अतिव दुःखामुळे त्याने गावी येणे फार कमी केले. बहीणीच्या अकाली निधनामुळे 1978 साली सुरू केलेला बंगला त्याने अर्धवटच सोडून दिला. मुंबकेतील दुमजली बंगल्यासह 6 जमिनी, आंबा कलमांची बाग आणि लोटे येथील एक प्लॉट अशी एकूण मालमत्ता शासनाने आपल्या ताब्यात घेतली. या सर्व मालमत्तांचे अ‍ॅन्टी स्मगलिंग एजन्सीकडून मूल्यांकनानंतर किंमत ठरविण्यात आली. तर 10 नोव्हेंबर 2020 रोजी व्हिडिओ कॉस्फरन्सद्वारे या सर्व मालमत्तांचा लिलाव करण्यात आला. यापूर्वी अ‍ॅड.वास्तव यांनी 02 नोव्हेंबी2020 रोजी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकर्‍यांसह मालमत्तेची पाहणी करून शासनाच्या परवानगीने या ठिकाणी स्वयंसेवी संस्था किंवा शाळा उभारण्याचा मानस व्यक्त केला होता.

Exit mobile version