। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
संगमेश्वर तालुक्यात वाळूमाफियांचा हैदोस सुरु आहे. प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधल्यामुळे वाळूमाफियांचे आयतेच फावले आहे. संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथील वातवाडी आणि सुतारवाडी हे वाळूमाफियांचे अड्डे बनले आहेत. हे वाळूमाफियांचे अड्डे प्रशासन उद्ध्वस्त का करत नाही? की वाळूमाफियांना प्रशासनाचाच वरदहस्त आहे का? असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. या वाळूमाफियांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा र्हास होत आहे.
गेल्या काही वर्षात संगमेश्वर तालुक्यात वाळूमाफियांनी आपले बस्तान बसवले आहे. करजुवे येथील वातवाडी आणि सुतारवाडीमध्ये चार ते पाच वाळूमाफिया दररोज बेसुमार वाळू उत्खनन करत आहेत. पुर्वी या परिसरात एक दोन माफिया वाळू उपसा करत होते. आता प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळूमाफियांची संख्या वाढली आहे. वाशूमाफियांची संख्या वाढत असताना प्रशासनाची कारवाई थंडावली आहे. संध्याकाळनंतर या वाळूमाफियांचे उद्योग सुरु होतात. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत वाळूची वाहतूक केली जाते. ही बेकायदेशीर वाळू वाहतूकही पोलिसांना सापडत नाही हा चिंतेचा विषय आहे.