| रायगड | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग डागोर यांनी रायगड जिल्ह्याला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सफाई कामगारांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला.
या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.) नेहा भोसले, सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण) सुनिल जाधव, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.शीतल जोशी, पोलीस उप अधीक्षक (गृह), जिल्हा समाज कल्याण अधिकारी (जि.प.), तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये उपस्थितांना संबोधित करताना अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी प्रचलित शासन निर्णय व परिपत्रकांच्या अनुषंगाने सफाई कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी प्रशासनाने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले.
लाड-पागे समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने सफाई कामगारांच्या वारसांना वारसाहक्काने नियुक्ती देण्याबाबत सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबियांमध्ये जाणीवजागृती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, वारसाहक्काने नियुक्ती मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधित यंत्रणेने स्वतः पुढाकार घेऊन सफाई कामगारांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करावे, असे निर्देश दिले. सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबियांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना, रमाई आवास योजना आणि आरोग्य सुविधांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांचा सुलभतेने लाभ घेता यावा, यासाठी त्यांचे वेळोवेळी प्रबोधन करण्यात यावे, असे मत अध्यक्षांनी व्यक्त केले. याचबरोबर सफाई कामगारांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत ‘नमस्ते भारत’ या योजनेखाली सुरक्षा किट तातडीने पुरवण्यात यावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या इयत्ता 1ली ते 10वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या शैक्षणिक योजनांचा लाभ घेण्यासाठी तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देशही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.






