यंदा भात पिकाच्या उत्पादनावर संक्रांत

रब्बी पिकाच्या उत्पादनात कमालीची घट
। माणगाव । प्रतिनिधी ।
दरवर्षी प्रमाणे यंदाचे वर्षीही माणगाव तालुक्यात डोलवहाळ बंधार्‍याच्या पाण्यावर उन्हाळी रब्बी हंगामातील भाताचे पिकाची लागवड शेतकर्‍यांनी फेबुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात केली असून रब्बी हंगामातील भाताचे पिक हे शाश्‍वत पिक म्हणून शेतकरी या मुख्य पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळतो. मात्र यंदाच्या वर्षी काळप्रकल्पाच्या कालव्याला मुदतीत पाणी न सोडल्याने तसेच 2 वेळ अवकाळी पाऊस पडल्याने शेतकर्‍यांनी यंदा कमी प्रमाणात भात पिकाची पेरणी करून लागवड केली. त्यामुळे माणगाव तालुक्याला भाताचे कोठार म्हणून असलेली ओळख यंदाच्या वर्षी पुसट झाली आहे. यंदा हजारो हेक्टर क्षेत्र भात पिकाच्या लावणी अभावी पडून आहे. याचा उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. माणगाव तालुक्यातील उन्हाळी हंगामातील हजारो हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकाचे उत्पादनात कमालीची घट झाली असून यंदा भात पिकाच्या उत्पादनावर चांगलीच संक्रांत कोपणार आहे.
गेल्या वर्षी सुमारे 1200 हेक्टर क्षेत्रावर भाताच्या पिकाची लागवड शेतकर्‍यांनी केली होती. कोकणातील माणसांचे मुख्य अन्न भात हे असून माणगाव तालुक्यातील शेतकर्‍यांनी यंदाचे वर्षी फक्त 98 हेक्टर म्हणजेच 245 एकरवर भात पिक लावले आहे. उर्वरित 1 हजार हेक्टर 2500 एकर क्षेत्र पडून आहे. गेल्या वर्षी सन 2020-21 मध्ये हेक्टरी उत्पादन हेक्टरी 40 क्विंटल प्रमाणे 44 हजार 400 क्विंटल सरासरी मिळाळे. यंदाचे वर्षी सन 2020-21 मध्ये 98 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाच्या उत्पादनात घट होवून 38 क्विंटल उत्पादन मिळू शकते. म्हणजेच 2940 क्विंटल उत्पादन मिळणार असून सुमारे 41 हजार क्विंटल भाताचे उत्पादन घटणार आहे. पर्यायाने तालुक्याच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम होणार असून याचा फटका जिल्ह्याच्या बाजारपेठेलाही बसणार आहे.
दरवर्षी 15 डिसेंबर रोजी कोकण हंगाम पिकासाठी काळ प्रकल्पांतर्गत डोलवहाळ बंधार्‍याचे पाणी डाव्या कालव्यातून माणगावमधील शेतीला सोडण्यात येते. यंदाचे वर्षी हे पाणी कालव्याला दरवर्षी पेक्षा पंधरा दिवस उशिरा सोडल्यामुळे शेतकरी नाराज होता. त्यातच दोन वेळ अवकाळी पाऊस पडल्यामुळे कांही शेतकर्‍यांनी रब्बी हंगामात 98 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली. यंदा फेब्रुवारी महिन्यात भाताची लावणी केल्यामुळे हे पीक उशिरा शेतकर्‍याच्या पदरात पडणार आहे.
यंदाचे वर्षी माणगाव तालुक्यात भात पिकाची लागवड 98 हेक्टर क्षेत्रावर केली असून यंदाचे वर्षी गेल्या वर्षीपेक्षा सुमारे 1 हजार हेक्टर क्षेत्रावर भाताचे पिक अवेळी पडलेल्या पावसामुळे लावता आले नाही. त्यामुळे भाताच्या उत्पनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.

कडधान्याच्या क्षेत्रात मोठी वाढ
यंदा भाताची क्षेत्र कमी झाले असले तरी कडधान्याच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. यंदा कडधान्य चवळी, वाल, मुग, हे कडधान्याचे बियाणे शासनाकडून शेतकर्‍यांना देण्यात आले. त्यामुळे यंदा कडधान्य 1285 हेक्टरवर पिकविले आहे. त्याचबरोबर कांही शेतकर्‍यांनी तूर, उडीत, हरभरा भुईमुग, तीळ तसेच भाजीपाला लागवड करण्यात आली आहे.

Exit mobile version