33 मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन
जीवनावश्यक वस्तुंसह दोन हजार ताडपत्रींचे वाटप
महाड | प्रतिनिधी |
महाडसह संपूर्ण कोकणात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमधील नागरिकांना मुंबईमध्ये कार्यरत असलेल्या सारथी आणि अमेरि केअर या संस्थांकडून मोलाची मदत करण्यात आली. तेवीस दिवसांपासून पाऊस वादळाचा विचार न करता अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भागांमध्ये असलेल्या वाड्या-वस्त्यांवर आरोग्य शिबिराचे आयोजन करुन अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. या संस्थांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले जात आहे.
मुंबईतील सारथी संस्थेचे अशोक जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली मदतीचे वाटप केले.गेल्या पाऊण महिन्यापासून अविरतपणे ही सेवा सुरु आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सारथी संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केले असून, आतापर्यंत 16 शाळा डिजिटल करण्यात आल्या असल्याची माहिती अशोक जंगले यांनी दिली. गेली 36 वर्षे रायगड जिल्ह्यात सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असताना संस्थेच्या मदतीने 42 शाळेच्या इमारती बांधून दिल्या आहेत.
महाड तालुक्याचा परिसर हा डोंगराळ आणि दुर्गम दर्या-खोर्याने व्यापलेला असून, यावर्षी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे फार मोठा फटका बसला आहे. या आपत्तीमध्ये ग्रामीण भागाचा संपर्कच तुटल्याने जीवित त्याचबरोबर वित्तहानीदेखील प्रचंड झाली. सारथीच्या माध्यमातून अविरत सेवा सुरु असून, जोपर्यंत जनजीवन पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत संस्थेचे मदतकार्य सुरुच राहणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अशोक जंगले यांनी सांगितले.