दोन महिन्यांत कोट्यवधींची हानी
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी जिल्ह्यात यंदाच्या पाऊस हंगामाच्या दोन महिन्यात पावसाने अडीच हजार मिमीची सरासरी गाठली आहे. या दोन महिन्यांत पावसाने चारवेळा रत्नागिरी जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण केली आहे. गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत यंदाचा पावसाची वाचटाल सध्या तरी समाधानकारक आहे. पावसाच्या या दोन महिन्यांत अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टमुळे जिल्ह्यात सुमारे 36 कोटींची हानी केली आहे.
यंदा पाऊस वार्षिक सरासरीपेक्षा 6 ते 15 टक्के अतिरिक्त होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बिगर मोसमीची सुरुवात मे अखेरीस झाली. त्यानंतर मोसमी पाऊस नियोजित 7 जुलै रोजी सुरू झाला. मात्र, अन्य भागांत झालेल्या वादळाच्या प्रभावाने कोकणातील मोसमी वार्याचा वेग आणि दिशा या दोन्हीत बदल होऊन पावसाचे वेळापत्रक नेहमीप्रमाणे निश्चित झाले. मात्र, 1 जूनपासून पावसाने हलक्या स्वरूपात सुरुवात केली तर जून अखेरपर्यंत मासिक सरासरीही गाठली.
नियमित पाऊस सुरू झाल्यानंतर शेतकर्यांनी खरिपाची बेगमी सुरू झाली. तसेच, जुलैमध्येही सातत्य राखल्याने लावणीची कामेही वेळेवर झाली. आतापर्यंत 77 टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षाच्या तुलनेत 15 ते 18 टक्के पाऊस जास्त झाला आहे. अजूनही पावसाचे दोन महिने शिल्लक आहेत. आतापर्यंत एकूण 2 हजार 355 मिमी पाऊस पडला असून पावसाची सरासरी 2 हजार 623 मिमी झाली आहे. हाच जोर राहिला तर काही दिवसांतच जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीसाठी आवश्य असलेला हजार मि.मी. पाऊस पडणार आहे. मात्र, या वादळी पावसाने पहिल्या दोन महिन्यातच जिल्ह्यात तब्बल 36 कोटी 67 लाख 57 हजार रुपयांचे नुकसान केले आहे.
या कालावधित जिल्ह्यातील प्रमुख नद्यांतील जलस्तर चारवेळा वाढून अनेकदा या भगात पूरस्थिती निर्माण केली. गेले दोन महिने सतत मुसळधार पडणार्या पावसाने नद्यांलगत असलेल्या तालुक्यांमध्ये नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. जोडीला वार्याचा मारा जोरदार असल्याने पडझड मोठ्या प्रमाणावर होत आहे. घरे, गोटे, दुकाने, शाळा, इमारती, साकव, पूल, सार्वजनिक विहिरी यांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
आपत्ती नियंत्रण विभागाची सतर्कता
अजूनही पावसाचे दोन महिने शिल्लक आहेत. ऑगस्ट महिन्यात पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. आता पाऊस श्रावणात सरीवर राहणार असला तरी काही भागांत जोरदार सक्रिय राहणार आहे. जिल्हा आपत्ती नियंत्रण विभाग या कालवधित 24 तास सतर्क राहणार आहे. जिल्हा आपत्ती विभागाने प्रामुख्याने नदीतील जलस्तरावर लक्षकेंद्रित केले असून, तेथील वाढलेल्या जलस्तरावर जिल्ह्यातील आपत्ती नियंत्रण यंत्रणा सतर्क केली आहे.