सावित्री खाडी पुन्हा प्रदूषित

ऐन पावसाळ्यात पाण्याला लाल भडक रंग

| महाड | प्रतिनिधी |

महाडजवळून वाहणारी सावित्री नदी आणि लगतच असलेली खाडी कालपासून ऐन पावसाळ्यात लाल भडक झाली आहे. पावसाचा फायदा घेत औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांकडून रसायनिक सांडपाणी नदीत सोडले जात आहे की वाया गेलेले रसायन वाहतूक करणारे टँकर खाडीत पाणी सोडतात की काय, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्रदूषणमुक्तीची टिमकी वाजवली जात असली तरी प्रदूषण मात्र कमी होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नसून गेली दोन दिवसांपासून महाडजवळून वाहणारी सावित्री नदी आणि लगतच असलेली खाडी प्रदूषित झाली आहे. पावसामुळे गढूळ झालेले सावित्री नदीचे पाणी अचानक लाल झाल्याचे दिसून आले आहे. महाडपासून थेट खाडीपर्यंतचे पाणी प्रदूषित झाल्याने पावसाची संधी घेत औद्योगिक क्षेत्रातील कंपनी अगर सांडपाणी वाहतूक करणाऱ्या वाहनाने हे सांडपाणी सोडून दिले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. महाडमधील सजग नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या महाड कार्यालयाला कळवून याबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महाड औद्योगिक परिसरातील कंपन्यांचे प्रदूषण ही एक चिंतेची बाब असून, गेली अनेक वर्षे याबाबत थेट कारवाया होऊनदेखील नदी प्रदूषित करण्याचा प्रकार आजदेखील सुरूच आहे. पावसाळ्यात कंपन्यांकडून रासायनिक सांडपाणी सोडून देण्याचे प्रकार यापूर्वीदेखील घडले आहेत. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळ नोटीसी देण्याच्या पोकळ कारवाया करत आहे. महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण रोखण्यासाठी महाड उत्पादक संघटनादेखील प्रयत्न करत असल्याचे भासवत असले तरी औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांकडूनच प्रदूषण केले जात असल्याचे वारंवार समोर येत आहे. पावसाचा फायदा घेत रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी वाहनेदेखील अंधारात हे पाणी नदीत सोडून देत असावीत, अशी शक्यता प्रदूषण मंडळाकडून व्यक्त केली जात आहे.

सावित्री नदीपात्रातील पाणी दूषित रात्रीच्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन राजरोसपणे कंपनीतील केमिकलयुक्त पाणी सोडण्यात येते. याचा आजूबाजूच्या रहिवाशांच्या आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता आहे. लोकांचा उदरनिर्वाह नदी पात्रातील माशांवर आहे, यामुळे मासेमारांवर उपासमारीची वेळ येईल. तात्काळ प्रशासनाने यावर निर्बंध घालावे.

जयवंत पड्याळ,
स्थानिक रहिवासी, महाड


सावित्री खाडीचे पाणी लाल भडक झालेले आहे, अशी माहिती तुमच्याकडून समजली असली तरी स्थानिक रहिवाशांनी मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची तक्रार केलेली नाही. पाण्याचे नमुने घेण्यात आले असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.

तानाजी पाटील,
उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, महाड

Exit mobile version