पाच महिन्यांत 39 लाख मतदार वाढले कसे?; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाला आहे, असा आरोप लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. मतदार याद्यांमध्ये हेराफेरी झाली असून, त्यात तफावत दिसून येत आहे. पाच वर्षे नाही, पाचच महिन्यांमध्ये मतदारांची लाट, एवढे मतदार कसे वाढले, असा खडा सवाल निवडणूक आयोला करीत हल्लाबोल केला.
लोकसभा विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर दिल्लीत शुक्रवारी (दि. 7) संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत तिघांनीही थेट निवडणूक आयोगावर निशाणा साधला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा अभ्यास केला. या निवडणुकीत महाघोटाळा झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. निवडणूक आयोग सरकारचं गुलाम झालं आहे. महाराष्ट्र निवडणुकीत 39 लाख मतदार कुठून आले? हे मतदार आता बिहारला जातील. त्यातील काही दिल्ली निवडणुकीतही दिसले. ते आता बिहार आणि यूपीलाही जातील, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
मतदार यादीत अनेक त्रुटी आहेत. 5 महिन्यांत 7 लाख मतदारांची नोंदणी झाली. निवडणुकीच्या आधी इतक्या मोठ्या संख्येत मतदारांची नोंदणी कशी झाली? असे अनेक प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले. विधानसभा निवडणूक 2019 आणि लोकसभा निवडणूक 2024 या 5 वर्षांच्या कालावधीत 32 लाख मतदार वाढले. पण लोकसभा निवडणूक 2024 आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान 5 महिन्यांच्या काळात 39 लाख मतदार वाढले. हे मतदार कोण आहेत? दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात राज्यातील एकूण लोकसंख्येपेक्षा अधिक मतदार कसे? 9 कोटी 54 लाख लोकसंख्या असताना मतदार त्यापेक्षा जास्त आहेत. काही करून महाराष्ट्रात अचानक मतदार उभे केले गेले, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला. आम्हाला मोठी तफावत आढळून आली आहे. निवडणक आयोगाकडे राज्यातील तीन मोठे पक्ष मतदार यादी मागत आहेत. आम्हाला महाराष्ट्रातील मतदारांची नावं आणि त्यांचे पत्ते असलेली मतदार यादी पाहिजे. आम्हाला लोकसभा निवडणुकीची मतदार यादी पाहिजे. नवे मतदार कोण आहेत, हे जाणून घेण्यासाठी आम्हाला विधानसभा निवडणुकीतील मतदार यादी फोटोसह पाहिजे. अनेक मतदारांची नावं हटवण्यात आली आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
प्रौढ मतदारांपेक्षा अधिक मतदार
सरकारी आकडेवारीनुसार, महाराष्ट्राची प्रौढ मतदारसंख्या 9.54 कोटी आहे. निवडणूक आयोगाच्या मते 9.7 कोटी मते महाराष्ट्रात आहे. म्हणजे, महाराष्ट्रात प्रौढ मतदारांपेक्षा अधिक मतदार आहेत, ते कसे काय, असा चोख सवालही राहुल गांधी यांनी विचारला आहे.