| नवीन पनवेल | वार्ताहर |
पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या पार्थ राकेश माने याने नुकत्याच उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
केंद्र शासनाच्या क्रीडा विभागाकडून दरवर्षी या राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. देशभरातील विविध राज्यांतील राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करणार्या खेळाडूंना या राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी पात्र ठरविले जाते. अशा मातब्बर खेळाडूंशी टक्कर देत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना पार्थने वयाच्या 17 व्या वर्षी मिळविलेले हे यश देशातील युवकांना प्रेरणा देणारे आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नेमबाज सुमा शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने हे भव्यदिव्य यश संपादन केले.
पार्थ माने याच्या सुवर्ण कामगिरीबद्दल प्रतिक्रिया देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर म्हणाले की, महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील आतापर्यंतची ही सर्वोच्च कामगिरी आहे. याआधीही जिमखाना विभागातील खेळाडूंनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट केली आहे परंतु नेमबाजीसारख्या अवघड व तांत्रिक क्रीडा प्रकारात पार्थने केलेली सुवर्णपदकाची कमाई सर्वोत्तम अशीच म्हणावी लागेल. पार्थ माने याच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागीय सल्लागार समितीचे चेअरमन बाळाराम पाटील, जे. एम. म्हात्रे, महेंद्र घरत, अरुण भगत, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष परेश ठाकूर तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते सूर्यकांत ठाकूर व संजय कडू आदी मान्यवरांनी विशेष कौतुक केले.