| पाली /बेणसे | प्रतिनिधी |
रायगड किल्ल्याच्या कुशीत वसलेल्या निजामपूर या अति दुर्गम आदिवासी पाड्यावर सारथी फाउंडेशनच्या अथक प्रयत्नांतून नव्या शाळेच्या इमारतीचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले आणि शाळेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. महाड तालुक्यातील या धरणग्रस्त पाड्यावर गेली सत्तावीस वर्षे अनेक आदिवासी कुटुंबे वास्तव्यास आहेत. एवढ्या दीर्घ काळातही येथे मूलभूत सुविधा आणि शैक्षणिक सोयींचा कायम अभाव राहिला. पूर्वीची शाळा इमारत पूर्णपणे जीर्ण अवस्थेत होती. छोट्या व तात्पुरत्या खोल्यांमध्ये मुलांना दाटीवाटीने बसावे लागत होते. शाळेत वीजच नव्हती आणि वादळी वाऱ्यात ती इमारत थेट धोकादायक बनत होती. या परिस्थितीचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसत होता.
रायगड जिल्ह्यात गेली चाळीस वर्षे दुर्गम भागात निस्वार्थपणे कार्यरत असलेले ज्येष्ठ समाजसेवक आणि सारथी फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जंगले यांच्या निदर्शनास ही दयनीय परिस्थिती आली आणि त्यांनी या विद्यार्थ्यांसाठी नवीन, सुरक्षित व सुसज्ज शाळा उभारण्याचा निर्धार केला. त्यांच्या पुढाकाराने सारथी फाउंडेशनच्या माध्यमातून आता येथे प्रशस्त वर्गखोली, वीज जोडणी, पंखे आणि ट्यूबलाईटसह सुसज्ज अशी नवी इमारत उभी राहिली आहे. शाळेसाठी आवश्यक आर्थिक सहाय्य राजश्री सामंत यांनी त्यांचे पुत्र सिद्धार्थ महादेव सामंत यांच्या पवित्र स्मरणार्थ दिले. एका मातेने आपल्या मुलाच्या आठवणीत दुसऱ्यांच्या मुलांसाठी शाळा उभारण्याचे हे कृत्य या सोहळ्याला खऱ्या अर्थाने भावपूर्ण करून गेले.
शाळेचे उद्घाटन मनिष पाटील यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्यास परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सारथी फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जंगले, महेश चव्हाण, निलेश पवार, प्राचार्य संदीप नगरकर ,गौरव जंगले, दिनेश डोके, प्रभाकर सावंत आणि गटशिक्षण अधिकारी राजनजी सुर्वे यांचीही या प्रसंगी उपस्थिती होती. दुर्गम डोंगरकपारीत राहणाऱ्या आदिवासी मुलांच्या डोळ्यांत आता शिक्षणाचे नवे स्वप्न पाहण्याचे धाडस आले आहे – आणि हीच या सगळ्या प्रयत्नांची खरी कमाई आहे.







