अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कुटीचालकाचा मृत्यू

। माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव तालुक्यातील गारळ गावच्या हद्दीत विहान हॉटेल समोर भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने स्कुटीला जोरदार धडक दिली. या अपघातात स्कुटीचालकाचा मृत्यू झाला. हा अपघात मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास घडला. ज्ञानेश्वर नथुराम लहाने (वय- 50, रा. गारळ, माणगाव) असे मृताचे नाव आहे. या अपघाताची फिर्याद योगेश चंद्रकांत लहाने (29), रा.गारळ, ता.माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर लहाने हे त्यांच्या ताब्यातील स्कुटीने (मुंबईकडून गोवा बाजूकडे) मुंबई लेनवरून गारळ गावाकडे जात होते. याचवेळी गोवा बाजूकडून मुंबई बाजूकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनचालकाने त्यांच्या स्कुटीला धडक दिली. यात स्कुटीचालक ज्ञानेश्वर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर स्कुटीचेदेखील नुकसान झाले. या अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेला. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चिकणे हे करीत आहेत.

Exit mobile version