। कोर्लई । वार्ताहर ।
शासनाच्या ‘स्वच्छ सागर सुरक्षित सागर’ अभियानांतर्गत आंतरराष्ट्रीय सागर किनारा स्वच्छता दिनानिमित्ताने मुरुडमध्ये नगरपरिषद, भारतीय तटरक्षक दल, वसंतराव नाईक महाविद्यालय-राष्ट्रीय सेवा योजना, अंजुमन इस्लाम जंजिरा महाविद्यालय,सर एस.ए.हायस्कूल व तळा येथील जी.एम.वेदक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवून समुद्रकिनारा चकाचक केला.
वसंतराव नाईक महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.एस.एस.भैरगुंडे व डॉ.गजानन मुनेश्वर यांच्या पुढाकाराने तसेच नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या अभियानात 145 स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या अभियानांतर्गत दि.15 ते दि.20 सप्टेंबर रोजी महाविद्यालयात पोष्टर, रांगोळी व सुविचार स्पर्धा घेण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय सागर किनारा स्वच्छता दिनानिमित्ताने सागर किनारा स्वच्छता अभियान मोहिमेसाठी नगरपरिषदेतर्फे हँडग्लोज, मास्क, पाणी, अल्पोपहार तसेच ट्रॅक्टर ट्रॉली, बीच क्लिनिंग मशीन सोयीसुविधा देण्यात आल्या होत्या. यावेळी विद्यार्थी, शिक्षक तसेच नगरपरिषदेतील आरोग्य निरीक्षक राकेश पाटील, कपिल वेल्हे, प्रशांत दिवेकर, सतेज निमकर, सचिन कोरके, अनिकेत भोसले, अभिजित चांदोरकर, भारतीय तटरक्षक दल अधिकारी, कर्मचारी वृंद यांनी या स्वच्छता अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन समुद्रकिनार्यावरील दोन टन कचरा गोळा करण्यात आला असून त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली.