मृतदेहाची विटंबना होण्याची शक्यता
। पनवेल । प्रतिनिधी ।
कळंबोली-रोडपाली येथील स्मशानभूमीत सध्या भटक्या श्वानांचा सुळसुळाट वाढला आहे. या भटक्या श्वानांमुळे मृतदेहांची विटंबना होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन श्वानांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी केली जात आहे. भटक्या श्वानांनी स्मशानभूमीत जळत्या चितेवरील मृतदेहाचे लचके तोडल्याच्या घटना या पूर्वी घडल्या आहेत. अशा घटना घडून मृतदेहांची विटंबना होण्याची शक्यता असल्याने या घटना रोखण्याठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे.
पनवेल पालिका हद्दीतील कळंबोली-रोडपाली परिसरात सिडकोच्यावतीने स्मशान भूमीची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाखोची लोकसंख्या असलेल्या या परिसरातील दररोज दोन ते तीन मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी आणले जात असल्याने सिडकोच्यावतीने कर्मचार्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. सरणावर लाकडं रचण्यापासून ते मृतदेह पूर्णपणे जाळण्याची जवाबदारी हे कर्मचारी पार पडतात. मात्र, या ठिकाणी वाढलेल्या भटक्या श्वानांच्या संख्येमुळे येथील कर्मचार्यांची डोकेदुखी वाढली आहे. स्मशान भूमीत भटकणार्या श्वानांचा वावर जळत्या चितेपर्यंत असल्याने कामगारांना अत्यंत काळजीपूर्वक आपले काम पूर्ण करावे लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पालिकेच्या अधिकार्यांशी या बाबत संपर्क साधला असता वारंवार या ठिकाणी श्वान पकडण्यासाठी गाडी पाठवण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, अनेकदा हे श्वान हाती लागत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
श्वान नियंत्रणासाठी लाखोरूपये खर्च
भटक्या श्वानांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिका प्रशासन दर वर्षी लाखो रुपये खर्च करते. या खर्चातून श्वानांचे निर्मितीकरण केले जात असल्याचा दावा प्रशासन करते. स्मशान भूमीत सध्या नुकतीच जन्माला आलेली श्वानाची पिल्ले फिरताना दिसून येत असल्याने प्रशासनाचा हा दावा फोल ठरताना दिसत आहे.
तीन ठिकाणी सरणाची व्यवस्था
स्मशान भूमीत अंत्यविधी करण्यासाठी तीन ठिकाणी सरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनेकदा सरणासाठी उपलब्ध करून दिलेल्या जागेतच श्वान आपली पिल्लं जन्माला घालत असल्याने मोठी गैरसोय होत असल्याची माहिती येथील कर्मचार्यांनी दिली आहे.