। पनवेल । वार्ताहर।
नॅशॅनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित ‘10वी वेस्ट झोन शूटिंग स्पर्धा’ नुकतीच अहमदाबाद गुजरात येथील ‘द अहमदाबाद मिलिटरी अँड रायफल ट्रेनिंग असोसिएशन’ याठिकाणी पार पडली. यावेळी 50 मीटर प्रोन पोझिशन पुरुष गटातील स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील पनवेलमधील खेळाडू अभिजित पाटील यांची थेट राष्ट्रीय पातळीवरील रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा नोव्हेंबर 2023 रोजी केरळ अथवा दिल्ली येथे पार पडणार आहे.
अहमदाबाद येथे पार पडलेल्या वेस्ट झोन निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दीव दमण, मध्य प्रदेश आदी राज्यातून सुमारे 200 स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी खेळताना अभिजित पाटील यांनी देदीप्यमान शूटिंग स्किल्स सादर करत आता थेट राष्ट्रीय पातळीवरील रायफल शूटिंग स्पर्धेत झेप घेतली आहे. मागील महिन्यात पुणे येथील बालेवाडी स्टेडियम येथे झालेल्या महाराष्ट्र एयर अँड फायरआर्म्स 2023 स्पर्धेत रायगड, मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, नागपूरसह राज्यातील विविध जिल्ह्यातील 400 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये अभिजीत पाटील यांनी आपल्या नैपुण्याने सर्वोत्कृष्ट नेमबाजीचे दर्शन घडविले.