। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातून पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ज्योर्तिलिंग ठिकाणी भीमाशंकर अभयारण्य ट्रेकर्स आणि शिवभक्त जात असतात. खांडस परिसरातून भीमाशंकर अभयारण्यामधून दोन वाटा जात असून, त्यातील अवघड समजला जाणारा शिडी घाट हा रस्ता निसरडा झाला असल्याने भाविक आणि ट्रेकर्स यांच्यासाठी बंद झाला आहे. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थ आणि रायगड पोलीस यांच्याकडून शिडीघाट बंद असल्याचे फलक लावण्यात आले आहेत.
बारा ज्योर्तिंलिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर येथील रायगड जिल्ह्यातून शेकडो भाविक आणि ट्रेकर्स ये-जा करीत असतात. कर्जत तालुक्यातून भीमाशंकर अभयारण्य असा प्रवास करून पर्यटक भीमाशंकर येथे पोहोचत असतात. खांडस परिसरातून भीमाशंकर येथे जाण्यासाठी दोन वाटा आहेत. त्यातील गणपती घाट हा सुरक्षित रस्ता समजाला जातो, तर अवघड आणि आव्हानात्मक म्हणून शिडीघाटाची ओळख आहे. शिडीघाटाने गेल्यावर कमी वेळात डोंगर चढता येत असल्याने ट्रेकर्स या मार्गाचा अवलंब करताना दिसतात. त्याच शिडीघाटात डोंगरातील उभ्या खडकावर लोखंडी शिड्या लावण्यात आल्या होत्या, मात्र चार वर्षांपूर्वी त्या शिड्या वादळी वारा आणि पावसामुळे कोसळल्या होत्या. त्यानंतर स्थानिकांनी लाकडी शिड्या बसविल्या असून, त्यांच्या सहाय्याने ट्रेकर्स अवघड कडा पार करून शिडीघाटाचा अडथळा पार करतात.
यावर्षी तब्बल महिना उशिरा श्रावण महिना आला आहे,त्यामुळे पावसाच्या सततच्या पाण्यामुळे खडक हे निसरडे झाले आहेत. त्याचा परिणाम शिडी घाटातून प्रवास करताना शनिवारी एक पर्यटक शिडी चढून जात असताना खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरवर्षी या शिडीघाटातून जाणार्या किमान एखाद दुसरी ट्रेकर्सला आपला जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे हा शिडीघाट धोकादायक समजला जातो. मात्र, शनिवार-रविवारी आणि सोमवारी ट्रेकर्स मोठ्या संख्यने शिडी घाटातून भीमाशंकर असा प्रवास करीत होते. परंतु सोमवारी शिडी घाटातील एक शिडी कोसळली असून, घाट निसरडा झाल्याने स्थानिक ती शिडी पुन्हा उभी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लाकडी शिडी पुन्हा उभी करण्याच्या प्रयत्नात ती 200 फूट खाली कोसळली आहे. त्यामुळे निसरडा डोंगर आणि खडक तसेच शिडी कोसळली असल्याने शिडी घाट ट्रेकर्स तसेच भाविक यांच्यासाठी बंद करण्यात येत असल्याचे बॅनर लावून जाहीर केले आहे.
शिडी घाटातील रस्ते हे सततच्या पावसामुळे निसरडे झाले असल्याने स्थानिकांच्या विनंतीनुसार शिडी घाट यावर्षीच्या श्रावण महिन्यासाठी बंद करण्यात आला आहे. तरी, भीमाशंकर ज्योर्तिंलिंग येथे जाणार्या भक्तांनी गणपती घाट या सुरक्षित असलेल्या रस्त्याने प्रवास करावा.
विजय लगारे, पोलीस उपअधीक्षक