नेरळच्या विद्या विकास मंदिर शाळेत लाठीकाठी प्रशिक्षण
| नेरळ | प्रतिनिधी |
शाळा, महाविद्यालयातील मुलींना अपप्रवृत्तीच्या मुलांकडून होणाऱ्या छेडछाडीसारख्या घटनांचा सामना करावा लागतो. अनेकदा त्याचा प्रतिकार होत नसल्याने त्यातून दुर्घटना घडतात. त्यासाठी त्यांना स्वसंरक्षणाचे धडे मिळाल्यास अडचणीच्या प्रसंगी उपयोगी होईल. या उदात्त हेतून नेरळ येथील विद्या विकास मंदिर शाळेच्या माध्यमातून विद्यार्थिनींना लाठीकाठी प्रशिक्षण देण्यात आले.
नेरळ गावातील विद्या विकास मंदिर, नेरळ शाळेत दंड (लाठीकाठी) आणि छुरीका यांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. लाठीकाठी आणि छुरीया प्रशिक्षक प्रतीक्षा मुंबईकर यांनी हे प्रशिक्षण दिले. तर, अनुराधा गोखले यांनी विद्यार्थ्यांना योगसाधनेचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम आणि सबळ बनविण्यासाठी या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षणाच्या प्रारंभी अनुराधा भाटकर-गोखले, शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विनया काकडे आणि प्रशिक्षक प्रतीक्षा मुंबईकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात एकात्मता मंत्राने करण्यात आली. त्यानंतर श्रीराम मंत्र आणि गीत यांनी या प्रशिक्षण शिबिराची सुरुवात झाली. अनुराधा गोखले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यात माशी आणि मधमाशी गोष्टीतून आपण काय निवडले पाहिजे, याबाबत माहिती दिली.
प्रशिक्षक प्रतिक्षा मुंबईकर यांनीदेखील लाठीकाठी प्रशिक्षण, नानचाकू आणि छुरीका यांच्या हाताळणीबाबत प्रात्यक्षिक दाखवून प्रशिक्षण उत्तम दिले. या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थिनींचा चांगला उत्साह दिसून आला. भविष्यात शाळेतील सर्व विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मुख्याध्यापिका विनया काकडे यांनी दिले.
