अवघ्या वीस दिवसांच्या बाळाची विक्री

दहा आरोपींना अटक

| मुंबई | प्रतिनिधी |

अवघ्या 20 दिवसांच्या नवजात बाळाची पैशांसाठी खरेदी-विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार मुंब्र्यात उघडकीस आला आहे. बाळाच्या आईवर दबाव टाकून त्याचा अडीच लाख रुपयांत सौदा करण्यात आला. मात्र, पुढे हेच बाळ वेगवेगळ्या लोकांच्या हातातून जात साडेसहा लाखांच्या व्यवहारापर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. मुंब्र्यातून सुरू झालेला बाळाचा प्रवास जालना आणि पुढे रत्नागिरीपर्यंत झाला. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी रत्नागिरीतून बाळाची सुखरूप सुटका केली असून, दहा आरोपींना अटक केली आहे.

कळवा येथील शांतीनगरमध्ये राहणारी अनिसा रफीक शेख ही मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात भीक मागते. तिच्या 20 दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी रेहान रिजवान शेख याने दबाव आणल्याचा आरोप आहे. या व्यवहारात अनिसाला एक लाख 95 हजार रुपये देण्यात आले होते. मात्र, बाळाच्या विक्रीचा प्रकार उघड होऊ नये म्हणून तिच्यावर दबाव टाकत व्यवहाराची रक्कमही लुटल्याचे तक्रारीत नमूद आहे. एवढेच नव्हे, तर अनिसा आणि तिच्या बहिणीला मारहाण करून पैसे हिसकावण्यात आल्याचाही आरोप आहे.

या प्रकारानंतर अनिसाने 5 नोव्हेंबर रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी पाच स्वतंत्र पथके तयार केली. या पथकांनी मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण आणि जालना येथे तपास केला. बाळाला नेमके कुठे ठेवण्यात आले आहे, याचा शोध घेत पोलिसांनी संशयितांच्या हालचालींची माहिती गोळा केली. तपासादरम्यान बाळाला मुंब्र्यातून कल्याण आणि दिवा येथे नेत पुढे रत्नागिरीला पोहोचवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या माहितीच्या आधारे रत्नागिरीत कारवाई करून बाळाला ताब्यात घेतले. बाळाची सुखरूप सुटका झाल्यानंतर या व्यवहारामागील साखळी उघड होऊ लागली. सुरुवातीला अडीच लाख रुपयांत ठरलेला व्यवहार पुढे साडेसहा लाख रुपयांपर्यंत गेल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणात दहा जणांना अटक करण्यात आली असून, आणखी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक केलेल्या दहा आरोपींना न्यायालयाने 10 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.

Exit mobile version