बापरे! अर्भकाची अडीच लाखात विक्री; आठजण अटकेत

| पनवेल | वार्ताहर |

मुंबईतील मानखुर्द येथे राहणाऱ्या महिलने मध्यस्थींच्या मदतीने आपल्या 17 दिवसाच्या बाळाला अडीच लाख रुपयांमध्ये विकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना खारघरमध्ये उघडकीस आली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सदर पथकाने खारघरमध्ये सापळा लावून लहान बाळाला विकण्यासाठी आलेल्या आईला तसेच बाळ विक्रीसाठी मध्यस्थी करणारे अशा एकूण 8 जणांना अटक केली आहे.

या कारवाईत अटक करण्यात आलेल्या टोळीने अशाच पध्दतीने अनेक लहान मुलांची विक्री केली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कारवाईत अटक करण्यात आलेल्यांमध्ये बाळाची आई मुमताज रहेमान मंडळ (28, रा.मानखुर्द महाराष्ट्र नगर), मध्यस्थी मुमताज नियाज अब्बास खान (48), नदिम शाहिद अहमद अन्सारी (29), गुलाम गौस अहमद अन्सारी (37), सुरेश शामराव कांबळे (60) सर्व राहणार मुंब्रा तसेच जुबेदा सैयद रफिक (49), शमिरा बानु मोहद्दीन शेख (42) दोघे राहणार चिता कॅम्प ट्रॉम्बे आणि दिलशाद आलम (42) राहणार बांद्रा खेरवाडी अशा आठ जणांचा समावेश आहे. सदर टोळी लहान मुलांना पळवून नेऊन त्यांची विक्री करत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने एका महिलेच्या माध्यमातून या टोळीसोबत व्हॉटस्ॲप वरुन मागील एक महिन्यापासून संपर्क ठेवला होता. या चॅटींगदरम्यान पोलिसांच्या पथकाने लहान मुल खरेदीबाबत चौकशी केल्यानंतर या टोळीने अडीच लाख रुपयांमध्ये नवजात बाळ विकत देण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने लहान मुल विकत घेण्याची तयारी दर्शवून त्यांना खारघर येथे बोलावून घेतले होते. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर आणि त्यांच्या पथकाने खारघर, सेक्टर- 21 मधील सिध्दी विनय बिल्डींग जवळ सापळा लावला होता.

यावेळी या टोळीतील मुमताज खान, रिक्षा चालक नदिम शाहिद अन्सारी आणि बाळाची आई मुमताज रहेमान मंडळ असे तिघे जण 17 दिवसाच्या बाळाला घेऊन रिक्षा मधून खारघरमध्ये आले होते. यावेळी बाळाच्या खरेदी विक्रीचे अडीच लाख रुपये दिल्यानंतर पोलिसांनी तिघांची धरपकड करुन त्यांना ताब्यात घेत त्यानंतर पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली. या बाळाच्या विक्री व्यवहारातील इतर पाचजण सहभागी असून सर्व मुंब्रा येथे असल्याची मिळाली. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक मुंब्रा येथून इतर पाच जणां देखील ताब्यात घेतले.

कारवाईत अटक करण्यात आलेली टोळी लहान मुले पळवून त्यांची विक्री करुन लाखो रुपये मिळवत असल्याचे आढळून आले आहे. या सर्वांविरोधात बाळाची विक्री केल्याप्रकरणी तसेच बाल न्याय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन सर्वांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने अशाच पध्दतीने लहान बाळांची बेकायदेशीररित्या खरेदी-विक्री केली असण्याची शक्यता आहे. त्यानुसार पुढील तपास करण्यात येत आहे.

अतुल आहेर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
Exit mobile version