नामवंत कंपन्यांच्या नावाखाली बनावट सिमेंटची विक्री

तळोजा येथील गोदामांवर गुन्हे शाखेचा छापा

। पनवेल । प्रतिनिधी ।

बांधकामासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या भेसळयुक्त सिमेंट बनविण्यात येत असलेल्या तळोजा भागातील एका गोडाऊनवर गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने छापा मारुन मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त सिमेंटच्या गोण्या जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे हे भेसळयुक्त निकृष्ट सिमेंट नामांकित कंपन्यांच्या गोण्यांमध्ये भरुन त्याची बाजारात विक्री करण्यात येत असल्याचे तपासात आढळून आले आहे. तळोजा पोलिसांनी या प्रकरणात एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच पुढील तपास सुरु केला आहे.

तळोजा येथील रोहिंजण भागातील अमन मार्केट परिसरातील एका गोडाऊनमध्ये भेसळयुक्त सिमेंट तयार करण्यात येऊन सदरचे निकृष्ट सिमेंट नामांकित कंपन्यांच्या गोण्यांमध्ये भरुन त्याची बाजारात विक्री करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट-2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील व त्यांच्या पथकाने मंगळवारी (दि.10) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रोहींजण येथील एका गोडाऊनवर छापा मारला. यावेळी सदर गोडाऊनमध्ये अल्ट्राटेक, अदानी अंबुजा आणि ए.सी.सी. या सारख्या नामवंत कंपन्यांच्या सिमेंटचा बनावट साठा करुन ठेवल्याचे आढळून आले.

त्यानंतर पोलिसांनी अल्ट्राटेक आणि अंबुजा कंपनीच्या सिमेंटने भरलेल्या 73 गोण्या तसेच दगड झालेले निकृष्ट सिमेंट असलेल्या 250 पेक्षा जास्त गोण्या, सिमेंट गाळण्यासाठी लागणारी चाळणी, लोखंडी जाळी, नरसाळे आणि शेकडो रिकाम्या गोण्या अशा एकूण 55,970 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच सिमेंटमध्ये भेसळ करणाऱ्या सुशील प्रकाश कटके याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे.

अशा पद्धतीने केली जात होती सिमेंटमध्ये भेसळ
आरोपी मुदत संपलेले आणि दगड झालेले निकृष्ट दर्जाचे सिमेंट पुन्हा फोडून, गाळून त्याची पावडर तयार करत होता. त्यानंतर ही पावडर तो नामवंत कंपन्यांच्या रिकाम्या गोण्यांमध्ये बेकायदेशीरपणे भरुन त्यांची बाजारात विक्री करत होता. यामुळे सिमेंट कंपन्यांच्या नावलौकिकाला बाधा येत होती. तसेच अशा निकृष्ट सिमेंटमुळे बांधकामाच्या मजबुतीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होऊन लोकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला होता.
Exit mobile version