| पनवेल | प्रतिनिधी |
शेअर बाजारात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी खारघरमधील 73 वर्षीय निवृत्त जनरल मॅनेजरला 65 लाख 19 हजार रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खारघर सेक्टर-21 मधील रहिवासी असलेल्या या ज्येष्ठाला अपस्टॉक कंपनीच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडण्यात आले होते. तेथे आदिती वर्मा, काव्या चतुर्वेदी आणि इतर संशयितांनी नफ्याचे खोटे स्क्रीनशॉट्स दाखवून त्यांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले. आरोपींनी जनावट ॲपद्वारे रजिस्ट्रेशन करायला लावून विविध बँक खात्यांमध्ये तब्बल 65 लाख 19 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. ॲपवर मोठा नफा दिसू लागल्याने ज्येष्ठाने पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी आणखी 27 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न भरल्यास खाते फ्रीज करण्याची धमकी देण्यात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने नवी मुंबई सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
ज्येष्ठाला लाखोंचा गंडा
