अनेक लहान मुलांचे प्राण वाचवले
। खांदा कॉलनी । प्रतिनिधी ।
कामोठे सेक्टर-10 येथील गणपती गोवारी सोसायटीमध्ये मोकाट कुत्र्याच्या हल्ल्याच्या घटनेत एका ज्येष्ठ नागरिकाने प्रसंगावधान आणि अपूर्व धाडस दाखवत अनेक लहान मुलांचे प्राण वाचवले. या धाडसी कृतीबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
सोसायटीचे रहिवासी कृष्ण बुधाजी म्हात्रे (64) यांनी मोकाट कुत्रा लहान मुलांवर झेपावत असल्याचे पाहताच क्षणाचाही विलंब न करता मुलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न केला. मुलांचे संरक्षण करताना त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कुत्र्याचा सामना केला. या झटापटीदरम्यान कुत्र्याने म्हात्रे यांच्या हाताला चावा घेतला. त्यानंतर त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. सुदैवाने त्यांच्या धाडसी हस्तक्षेपामुळे अनेक निष्पाप मुले संभाव्य गंभीर दुर्घटनेपासून बचावली.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी कृष्ण बुधाजी म्हात्रे यांच्या धैर्य, सामाजिक बांधिलकी आणि निःस्वार्थ वृत्तीचे मनापासून कौतुक केले. अशा संकटाच्या क्षणी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांचे प्राण वाचविण्याची त्यांची कृती समाजासाठी प्रेरणादायी असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, परिसरात वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येकडे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही स्थानिक नागरिकांनी केली आहे.







