गटशिक्षण अधिकाऱ्यांनी सेवाज्येष्ठता डावळली

मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात मोठया प्रमाणात अधिकारी वर्गाची मनमानी सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. मग केंद्रप्रमुख भरती असो अथवा आर.टी.ई च्या यादीमध्ये फेरबदल असो. एक ना अनेक भानगडी सध्या पेण तालुक्यात सुरू आहेत. त्यातील एक म्हणजे केंद्रप्रमुख पदे भरताना गटशिक्षण अधिकाऱ्यांनी सेवा ज्येष्ठता डावलली.

कृषीवलला प्राप्त झालेल्या वृत्तसंस्था जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी एक पत्र काढले आहे. त्या पत्रामध्ये केंद्र प्रमुख कुणाला करता येईल या बाबत अटी व शर्ती दिल्या आहेत. मात्र त्या पत्राला गटशिक्षण अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवत, आपल्या मर्जीतील काही उपशिक्षकांना केंद्र प्रमुख म्हणून बढती दिली आहे. नियमानुसार केंद्र प्रमुखाची जबाबदारी ही पदवीधर अथवा बी.एड झालेल्या शिक्षकांनाच देणे क्रमप्राप्त आहे. जर हे शिक्षक केंद्र प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळत नसतील तर त्यांचा नकार पत्र घेणे क्रमप्राप्त आहे. त्यांचा नकार पत्र घेतल्यानंतर सेवा ज्येष्ठतेनुसार या पदाची जबाबदारी दयायची आहे. परंतु, पेण तालुक्यातील खरोशी केंद्राची जबाबदारी प्रफुल्ल सुखचंद (उपशिक्षक), कामार्ली नितीन दहिफळे (उपशिक्षक), गागोदे पुनम पाटील (उपशिक्षक), कासू जर्नादन मोकल (उपशिक्षक), यांच्यावर जबाबदारी टाकली आहे. सेवा ज्येष्ठता डावळल्यामुळे शिक्षकांमध्ये नैराष्याचे सावट आहे परंतु गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या विरुध्द बोलण्यास कुणी पुढे येत नाहीत.

याबाबत गटविकास अधिकारी भाउ साहेब पोल यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, याबाबत मला काहीही माहिती नाही मला गटशिक्षण अधिकाऱ्यांशी बोलावे लागेल. जर आपल्या म्हणण्याप्रमाणे उपशिक्षकांच्या नियुक्त्या केल्या असतील तर त्या नियुक्त्या रद्द करून उचित कारवाई केली जाईल.

Exit mobile version